संदीप आचार्य

राज्याचा ग्रामीण भागात साथरोग आजाराने उचल खाल्ली असून हिवताप, डेंग्यू तसेच इन्फ्लुएंझा एच १ एन १ चा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. अनेक दुर्गम व आदिवासी भागातील गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटून आरोग्य व्यवस्था पोहोचू शकत नाही हे लक्षात घेऊन यंदा आधीच आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.

गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढले असून पावसाळी व साथरोग आजारांचा विचार करून आरोग्य विभागाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुन्या तसेच स्वाईन फ्लू एच १ एन १ चे रुग्ण वाढू लागले आहेत. यंदा मे ते १४ जुलैपर्यंत हिवतापाच्या ४८७८ रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये राज्यात १२,०८५ लोकांना हिवतापाची लागण झाली होती तर १४ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गडचिरोली, मुंबई, ठाणे, गोंदिया, चंद्रपूर आदी भागात हिवतापाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून आले आहेत. गेल्यावर्षी डेंग्यूच्या १,१४,०४७ संशयित रुग्णांमधून १२,१८६ डेंग्यु विषणुयुत्त रुग्ण आढळले होते. डेंग्यू मुळे एकूण ४२ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदा मे ते १४ जुलै दरम्यान १,४९१ विषाणुबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चिकनगुन्याने बाधित असलेल्या ४,४५८ रुग्णांची गेल्या वर्षी नोंद करण्यात आली होती. यंदा मे ते १४ जुलैपर्यंत ४५९ रुग्णांचा शोध घेण्यात येऊन त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले.

गेल्यावर्षी लेप्टोस्पायरोसिसचे राज्यात ३४७ रुग्ण सापडले तर या आजारामुळे १० जणांचा मृत्यू झाला. यंदा आतापर्यंत लेप्टोस्पायरोसिसचे ४० रुग्ण सापडले असून प्रामुख्याने किनारपट्टी भागात हा आजार दिसून येतो. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड आदी भागात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळून येतात.

विश्लेषण : पश्चिम बंगालमध्ये आढळलेला ‘काळा ताप’ नेमका आहे तरी काय?

हिवतापामध्ये प्लाझमोडियम फॅल्सीपेरम हा अत्यंत घातक असून यामुळे मेंदूचा हिवताप होऊन रुग्ण दगावू शकतो. यामुळे केंद्राच्या मार्गदर्शन तत्वांच्या अधिन राहून राज्यात हिवताप निर्मूलनासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येतात असे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगितले. यात नवीन हिवताप रुग्ण शोधण्यासाठी पाडे, वाड्या, वस्ती व गावपातळीवर व्यपक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येते. दुर्गम व अतिदुर्गम भागात हिवतापाचे तात्काळ निदान व्हावे यासाठी रॅपिड डायग्नोस्टिक किटचा पुरवठा केला जातो. आशांना प्रशिक्षित करण्याबरोबर राज्यात हिवताप निदानासाठी ६९ सेंटीनल सेंटर स्थापन करण्यात आल्याचे डॉ. आंबेडकर म्हणाले. कीटकनाशक फवारणी, आळीनाशक फवारणी, कीटकनाशक भारित मच्छरदाणी वाटप केले जाते. तसेच दरवर्षी जून व जुलै महिन्यात हिवताप- डेंग्यू प्रतिरोध उपक्रम राबवले जात असल्याचेही डॉ. आंबेडकर यांनी सांगितले.

Live Updates
Story img Loader