डेंग्यू, मलेरिया, हिवताप व गॅस्ट्रोने पीडित रुग्णांची संख्या जिल्हाभरात वाढत असून शासकीय-खासगी रुग्णालयांत उपचारासाठी मोठय़ा प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत.
पावसाळय़ाच्या सुरुवातीला साथरोग प्रमाणात वाढ होते. त्यामुळे जनतेला दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात येतात. या वर्षी पावसाळा बेताचाच होता. दोन महिन्यांपासून अभावाने पडणारा पाऊस ही सार्वत्रिक तक्रार आहे. मात्र, याही स्थितीत डेंग्यू, मलेरिया, हिवताप व गॅस्ट्रोपीडित रुग्णांची संख्या कमालीची वाढत असल्यामुळे डॉक्टरही चकित होत आहेत. ऑक्टोबरात निवडणुकीचे वातावरण असतानाही साथरोगांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाण्याचा कोरडा दिवस पाळणे, गप्पी मासे पाण्यात सोडणे, अॅबेटिंग व धूरफवारणी यासाठी लोकांमध्ये जागृती करण्यात आल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले. लोकांनी काळजी घेतली असली, तरीही साथरोगांनी मोठय़ा प्रमाणात उचल खाल्ली आहे. ऑक्टोबरातच डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो व हिवतापाचे तब्बल ४८ रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरमध्ये २३ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले.
स्वच्छता मोहिमेबाबत पंतप्रधानांनी स्वत लक्ष घातले आहे. मोहिमेत गावोगावच्या लोकांनी सहभाग दिला आणि गाव स्वच्छ ठेवल्यास साथरोगाचा उद्रेक थांबू शकेल. हवामानातील बदलामुळे साथरोगाचा उद्रेक होत आहे. दोन दिवसांपूर्वी हवेत अचानक गारठा वाढला. मात्र, मंगळवारी पुन्हा तापमानात वाढ झाली. या तफावतीचाही परिणाम आरोग्यावर होत आहे. सर्दी, पडसे, ताप, खोकला, डोकेदुखी अशा आजारांनीही चांगलीच उचल खाल्ली आहे.
जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा हिवताप अधिकारी व मनपा आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक घेऊन सूचना दिल्या.

Story img Loader