एकीकडे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्याचा आरोग्य विभाग प्रयत्न करीत असताना मिरज तालुक्यातील वड्डी येथे शनिवारी दोन रुग्णांचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला. थकबाकीसाठी पाणी बंद केल्याने गावात उपलब्ध पाणी वापरले जात असल्याने गावात गॅस्ट्रोची साथ पसरली असून भारती, शासकीय आणि खाजगी रुग्णालयात १६ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. यापकी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाची प्रकृत्ती चिंताजनक आहे.
मिरज शहरापासून ५ किलोमीटरवर असणाऱ्या वड्डी या गावात श्रीमती शालन कृष्णा नाईक आणि सत्याप्पा लक्ष्मण नाईक या दोघांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला. दोन दिवसांपासून जुलाब, उलटीने लोकांना त्रास होत आहे. भारती हॉस्पिटलमध्ये ४, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ६ आणि मिरजेतील एका खाजगी रुग्णालयात ६ रुग्ण गॅस्ट्रोवर उपचारासाठी दाखल झाले आहेत. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या ६ पकी एका रुग्णांची प्रकृत्ती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
गावात गेल्या दोन महिन्यांपासून जीवन प्राधिकरणचे पाणी थकबाकी वसुलीसाठी बंद करण्यात आल्याने गावकरी गावात उपलब्ध असणारे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने गॅस्ट्रोची साथ पसरल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ग्राम पंचायतीने गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही अथवा जीवन प्राधिकरणची थकबाकी भरण्याची व्यवस्था केलेली नसल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
सांगलीत आता डेंग्यूबरोबर गॅस्ट्रोची साथ
एकीकडे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्याचा आरोग्य विभाग प्रयत्न करीत असताना मिरज तालुक्यातील वड्डी येथे शनिवारी दोन रुग्णांचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला.
First published on: 09-11-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue with gastro in sangli