वाई: महाबळेश्वर पाचगणी सह साताऱ्यात सर्वत्र दाट धुके आणि ढगाळ वातावरण आहे.सर्वत्र पहाटे पासून हलका व मध्यम पाऊस आणि काळवंडलेले वातावरण आहे.
आज पहाटे पासून महाबळेश्वर, पाचगणी,भिलार, सातारा शहर, वाई, भुईंज, मांढरदेव, खंडाळा, जावळी तालुक्यात दाट धुके आणि अंधारमय वातावरण आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून या परिसरात ढगाळ वातावरण आहे. थंडीही बऱ्यापैकी आहे. मात्र आज सकाळपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. महाबळेश्वर पाचगणी,सातारा परिसरात पहाटे हलका व मध्यम पाऊस झाला. दाट धुके थंडगार वातावरण आहे.
महाबळेश्वर पाचगणी भिलार सर्वत्र छानशी धुक्याची चादर पसरली आहे. वेण्णालेक परिसरावर धुके पसरल्याने परिसरातील व्यवसाय प्रभावीत झाले आहेत. सातारा शहर व तालुका परिसरात पहाटेपासूनच वातावरण पूर्णपणे ढगाळ झालेले आहे. सकाळी साडे आठ नऊ वाजता ही सूर्यदर्शन नागरिकांना झालेली नाही. पहाटे हलका व मध्यम पाऊस झाल्याने रस्त्यावर ओलसरपणा दिसत आहे. अजिंक्यतारा किल्ला ही स्पष्टपणे सातारकरांना आज सकाळी नऊ वाजताही दिसू शकला नाही. इतके ढगाळ वातावरण आहे.
हेही वाचा : देशाच्या विविध भागांत आज मुसळधार पावसाचा अंदाज
मांढरदेव वाई भुईंज जावली खंडाळा आदी परिसरातही असेच वातावरण आहे. पुणे बंगळूर महामार्गावर अशा वातावरणामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पावसामुळे काही पिकांना फायदा होईल तर काही पिकांना तोटा होण्याची शक्यता आहे.