सांगली: मिरजेत रंगपंचमी साजरी करुन शेततळ्यात पोहायला गेलेल्या दंत वैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मिरजेत बुधवारी घडली. मिरजेतील सुभाष नगर येथील हुळळे प्लॉट याठिकाणी असणाऱ्या सचिन मजती यांच्या फार्म हाऊसवरील शेततळ्यात रंगपंचमी साजरी करुन अंघोळीसाठी दंत महाविद्यालयात शिक्षण घेत असणारे तरुण गेले होते.
शेततळ्यात पोहायला गेलेल्या क्षितिजकुमार कुंडलिक क्षीरसागर (वय २२ रा.अहिल्यानगर) या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे. तो भारती दंत महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. रंगपंचमी निमित्त दंत महाविद्यालयाचे पाच ते सहा तरुण याठिकाणी असणाऱ्या फार्म हाऊस वर रंगपंचमी खेळण्यासाठी आले होते.
याठिकाणी रंगपंचमी खेळून झाल्यानंतर सर्वजण शेततळ्यात पोहायला गेले होते. मात्र पोहताना पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.यावेळी सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सिद हे घटनास्थळी पोचले. तसेच सांगली स्पेशल रेस्क्यूस फोर्सच्या मदतीने सदरचा मृतदेह पाण्यातून काढून मिरज शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सदर घटनेची माहिती मिळताच भारती दंत महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी घटनास्थळी जमा झाले होते.