इटलीच्या जिनोआ विद्यापीठाच्या सहकार्याने मेघे अभिमत विद्यापीठ दंतरोपण शास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करणार असून यामुळे दंतशास्त्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलपती व माजी खासदार दत्ता मेघे यांनी दिली.
सुदूर प्रसिध्द सावंगी येथील गणेशोत्सवास सुरुवात झाली. त्याबाबत तसेच विद्यापीठाच्या उपक्रमाविषयी दत्ता मेघे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सावंगी येथील गणेशोत्सवात विदर्भभरातील गणेशभक्त उपस्थित होत असल्याने त्यांना आरोग्यसेवेचा लाभ व्हावा म्हणून विविध सेवा या दहा दिवसात मोफ त उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे नमूद करीत मेघे म्हणाले की, संस्थेत कार्यरत मूर्तीकार सुनील येनकर यांनीच संस्थेतील अकरा फु टी गणेशमूर्ती साकारली आहे. आकर्षक रोषणाई, सप्तरंगी कारंजी, मनोवेधक सजावट अशासह ज्ञान मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. ८ सप्टेंबरला बेस्ट ऑफ व्हेरायटी हे प्रमुख आकर्षण आहे.
मेघे विद्यापीठास वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दोनशे जागा मंजूर असून मेडिसीन विभागात अशीविशिष्ट (सुपर स्पेश्ॉलिटी) वैद्यकीय सेवेतील पाच पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे. मेंदू शल्यक्रिया, आकस्मिक औषधोपचार, हदयरोगशास्त्र या सेवेचे नवे अभ्यासक्रम सुरू झाले आहे. विद्यापीठाच्या महात्मा गांधी आर्युर्वेद महाविद्यालयात पाच नवे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार असून आता आठ विषयांचे पदव्युत्तर वर्ग पूर्ण होतील. शरद पवार दंत महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेश संख्या वाढली असून इटलीच्या सहाय्याने याच महाविद्यालय दंतरोपणाचा नवा अभ्यासक्रम सुरू होत आहे. यावर्षी संस्थेने केमोथेरेपी व मुख शल्यचिकित्सा केंद्र सुरू केले आहे. ८ सप्टेंबरला अत्याधुनिक सुविधांसह अस्थिरोग शल्यचिकित्सागृह व हदय चिकित्सागृहाचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती विशेष अधिकारी उदय मेघे यांनी दिली.
संस्थेच्या आयुर्वेद विभागात औषधी वनस्पतीच्या संवर्धनासाठी पॉली हाऊस तयार करण्यात आले आहे. त्यात देशभरातील दुर्मीळ अशा वनस्पतीची लागवड होत असून मध्यभारतातील हे असे एकमेव उद्यान ठरेल. राजीव गांधी आरोग्य योजनेंतर्गत सावंगीच्याच रुग्णालयात राज्यात सर्वाधिक म्हणजे ८० हजार रुग्णांनी लाभ घेतला. वर्षभर चालणाऱ्या विविध सेवांचीही यावेळी माहिती देण्यात आली. गणेशोत्सवा दरम्यान चालणाऱ्या आरोग्यसेवांचा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्ता मेघे यांनी यावेळी केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे व भारती गोडे यांच्या हस्ते गणेशपूजन झाले.