अहिल्यानगरः महापालिकेच्या आरोग्य विभागात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील १६ लाख ५० हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी अटक केलेल्या वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे व राष्ट्रीय आरोग्य अभियानचा शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार महादेव रणदिवे या दोघांना आज, गुरुवारी न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. १७) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा कोतवाली पोलिसांनी काल, बुधवारी दाखल केला व रात्री डॉ. बोरगे व विजयकुमार रणदिवे या दोघांना अटक केली. अटकेनंतर डॉ. बोरगेने पोलिस ठाण्यातून पलायनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या सर्वच कामकाजाच्या तपासणीचे आदेश दिले होते. तत्पूर्वी डॉ. अनिल बोरगे यांना निलंबित करण्यात आले होते. तिघा अधिकाऱ्यांच्या समितीने आरोग्य विभागाच्या कामकाजाची तपासणी करून आयुक्तांना अहवाल सादर केला. या अहवालानुसार शासकीय अभियानाच्या खात्यातून १५ लाख व नंतर १६ लाख ५० हजार रुपये रणदिवेच्या खात्यात वर्ग झालेले आढळले. १५ लाख रुपये टप्प्याटप्प्याने पुन्हा अभियानाच्या खात्यात वर्ग करण्यात आले. मात्र १६ लाख ५० हजार रुपये अद्यापि शासकीय खात्यात जमा झाले नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

या अहवालानुसार डॉ. राजूरकर यांनी अपहाराची फिर्याद पोलिसांकडे दिली. तपासी अधिकारी तथा कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व सरकारी वकील अमित यादव यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, रणदिवेने डॉ. बोरगे यांच्याशी संगमनेत करून १६ लाख ५० हजार रुपये स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात घेतले. त्याची दोघांनी काय विल्हेवाट लावली तसेच नियुक्ती काळात अधिकाराचा गैरवापर करून अशा प्रकारचे इतर गुन्हे केले आहेत का, याचा तपास करायचा असल्याने चार दिवस पोलीस कोठडी द्यावी. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने डॉ. बोरगे व रणदिवे या दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Story img Loader