जागतिक पातळीवरील मंदी आणि देशांतर्गत महागाईने अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला असला तरी दर वर्षी नाताळच्या सुट्टीत कोकणात येणाऱ्या पर्यटकांवर त्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही. सालाबादप्रमाणे यंदाही या निसर्गरम्य प्रदेशात सुमारे तीन लाख पर्यटक हजेरी लावतील, असा अंदाज आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर अनेक राजकीय पयर्टन स्थळे आहेत. तेथे राज्य पर्यटन महामंडळाबरोबरच खासगी व्यावसायिकांनी पर्यटकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्य़ातील वेळणेश्वर व गणपतीपुळे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात तारकर्ली येथे पर्यटन महामंडळाची उत्तम निवासव्यवस्था आहे. या तीन ठिकाणी मिळून एकूण १३० निरनिराळ्या दर्जाच्या खोल्या आहेत. शिवाय महामंडळाची मान्यताप्राप्त सुमारे सातशे न्याहरी व निवास केंद्रे या दोन जिल्ह्य़ांमध्ये आहेत. या सर्व ठिकाणी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण सध्याच्या नाताळच्या हंगामात झाले आहे. तसेच खासगी हॉटेल व्यावसायिकांबरोबरच अनेक ठिकाणी घरगुती स्वरूपाची भोजन व निवासव्यवस्थाही करण्यात आली आहे.
पर्यटकांना सुखावह निवास व भोजनव्यवस्थेबरोबरच करमणुकीसाठी ‘सागरी महोत्सव’ आयोजित करण्याची पद्धतही चांगली रुळू लागली आहे. गेल्या मार्च महिन्यात दापोली येथे अशा स्वरूपाचा महोत्सव झाला होता. गुहागरला गेल्या तीन वर्षांपासून सागरी महोत्सव होऊ लागला आहे. यंदा त्यामध्ये गणपतीपुळेपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या मालगुंड या सागरकिनाऱ्यावरील रमणीय स्थळाची भर पडली आहे. गेल्या २५ डिसेंबरपासून येथे सागरी महोत्सव सुरू झाला आहे. विविध प्रकारच्या अस्सल कोकणी खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सबरोबरच दररोज संध्याकाळी कोकणी लोककलांचा आविष्कार असलेले खास कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे या पहिल्याच उपक्रमाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून पर्यटक गोव्याच्या बरोबरीने कोकणाला पसंती देऊ लागले आहेत. कौटुंबिक आणि सुरक्षित वातावरण हे त्यामागील प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्टय़ाही गोव्यापेक्षा कोकण सर्व प्रकारे किफायतशीर ठरते. त्यामुळे कोकणात या हंगामात येणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांपासून तीन लाखांपर्यंत गेली आहे. यंदाही त्याच स्वरूपाची गर्दी येथील लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या ठिकाणी दिसू लागली आहे. मंदी किंवा महागाईचा फटका कोकणातील पर्यटन क्षेत्राला बसला नसल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.
कोकणच्या पर्यटनावर मंदी, महागाईचा प्रभाव नाही!
जागतिक पातळीवरील मंदी आणि देशांतर्गत महागाईने अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला असला तरी दर वर्षी नाताळच्या सुट्टीत कोकणात येणाऱ्या पर्यटकांवर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-12-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Depression in konkan tourism