कराड: राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या केवळ तीन – चार जागाच मिळतील ही माध्यमातीलच चर्चा असून, त्यात तथ्य नसल्याचे ठामपणे सांगताना, आमच्या बैठकीत प्रत्येकाचा मानसन्मान राखला जाईल अशी भूमिका घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराडमध्ये बोलताना सांगितले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर अजित पवार माध्यमांची बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व स्थानिक नेते या वेळी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीत प्रत्येकाचा मानसन्मान राखण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आम्ही तीनही प्रमुख घटक पक्षांनी एकत्र बसून चर्चा केलेली आहे. त्यातील चर्चेनुसार प्रत्येकाचा मानसन्मान राखला जाईल आणि त्या – त्या पक्षातील कार्यकर्त्यांनाही समाधान वाटेल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांकडून सुरू आहे.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live: “प्रत्येकाचा मान राखला जाईल”, जागावाटपावर अजित पवारांचं विधान; आज किंवा उद्या बैठक होणार!

शिवतारेंबद्दल वरिष्ठ पातळीवर निर्णय

लोकसभेच्या बारामती मतदारसंघातून माजीमंत्री विजय शिवतारे यांनी आपणास आव्हान दिले असल्याबाबत विचारले असता, त्याबाबत मला काही बोलायचे नाही. सर्वांनी सुसंस्कृतपणा दाखवावा हे मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे. शिवतारेंबद्दल वरिष्ठ पातळीवर काय तो निर्णय घेतला जाईल. पण ,महायुतीतील सर्व घटक पक्षांनी आपल्यातील वातावरण खराब होईल, गढूळ होईल अशा प्रकारचे कुठलेच वक्तव्य करू नये अशी अपेक्षा अजित पवार यांनी केली.

सातारच्या जागेवर दावा

लोकसभेची सातारची जागा मागितली का? या प्रश्नावर ते म्हणाले, विद्यमान खासदार असलेल्या सर्व त्या जागा ज्याला त्याला सोडायच्या अशी प्राथमिक चर्चा महायुतीत झालेली आहे. असे सांगत अजित पवारांनी सातारच्या जागेवर दावा असल्याचे स्पष्ट केले. एकूणच उमेदवारीबाबतचे चित्र आम्हालाही लवकरात लवकर स्पष्ट करावे लागणार आहे. कारण १४-१५ मार्चला देशामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

निलेश लंके यांनीच नुकतेच माध्यमांसमोर त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे यावर अधिक बोलणे योग्य नाही. महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे नाराज असल्याबाबत विचारले असता, या नाराजीची नोंद घेवून भाजपचे वरिष्ठ काय तो मार्ग काढतील असे पवार म्हणाले.

हेही वाचा… शरद पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य, “मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत, पण…”

सुनील शेळके तसा नाही

सुनील शेळकेंबद्दल शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले जेने- त्याने काय ती टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे. याबाबत शरद पवारांनी व्यक्त केलेले मतही मी ऐकलं आहे. आणि सुनील शेळके यांनीही याबाबत सांगितले आहे. पण, नेत्यांना कोणी काहीही सांगितलं तरी प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर त्याची शहानिशा केली पाहिजे अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली. सुनील तसा नाही, त्याचा स्वभाव तसा नाही, अनेक वर्ष मी त्याला ओळखतो.

प्रत्येकाची वेगळी भूमिका असली तरी आम्ही व्यक्तिगत कुणाचे दुश्मन नाही. आज इथे खासदार श्रीनिवास पाटील व आमदार बाळासाहेब पाटील भेटले. आम्ही एकमेकांना नमस्कार करतो ही मराठमोळी संस्कृती आहे परंपरा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister ajit pawar clears about ncp seat sharing formula for lok sabha 2024 election asj