राज्यात तीन चाकी सरकार असल्याची टीका विरोधकांकडून महाविकासआघाडी सरकारवर सातत्याने केली जाते, हे आपण पाहिलेलं आहे. या सरकारचं स्टेअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती असून, त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांसह संपूर्ण मंत्रिमंडळ सरकार चालवण्यासाठी साथ देताना दिसत आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: रिक्षा चालवून दाखवल्याचा व्हिडिओ समोर आल्याने सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील पियाजिओ कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक रिक्षाची, स्वतः ती चालवून ट्रायल घेतली. त्यावेळी हा व्हिडिओ शूट करण्यात आला.
सध्या देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भि़डलेले आहेत. सामान्यांना वाहन चालवणं कठीण झालं आहे. परिणामी आता इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढू लागला आहे. विविध कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे वळत आहेत.
View this post on Instagram
आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी तेथील पियाजिओ कंपनीला भेट दिली. तेव्हा त्यांना कंपनीच्या इलेक्ट्रिक रिक्षा बद्दल तेथील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावर उपमुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती जाणून घेत, ही रिक्ष नेमकी कशी चालते हे पाहण्यासाठी स्वतःच रिक्षा चालवण्याचा निर्णय घेत, प्रत्यक्षात ही इलेक्ट्रिक रिक्षा कंपनीच्या आवारातच चालवली. तर, पर्यावरण संसरक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहने योग्य आहेत, असे सांगत त्यांनी कंपनीच्या या रिक्षाची स्तुती देखील केली.