शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आगामी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आलं, तर देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या फडणवीसांची उपमुख्यमंत्री नियुक्ती झाल्याने त्यांचं राज्यात राजकीय वजन कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच त्यांनी अलीकडे आपलं शारिरीक वजनही कमी केलं आहे, याबाबत प्रश्न विचारला असता फडणवीसांनी भन्नाट उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, “माझं वजन किती कमी झालंय? हे मला माहीत नाही. पण मी माझ्या टेलरला टाइट केलं आहे. त्यामुळे त्याने माझे कपडे असे शिवायला सुरू केले, ज्यामुळे माझं वजन कमी दिसतं.”

राजकीय वजनावर भाष्य करता फडणवीस पुढे म्हणाले की, राजकारणात तुम्ही कोणत्या पदावर आहात, यावरून तुमचं वजन ठरत नाही. तुम्ही स्वत: काय आहात, याच्या आधारावर तुमचं राजकीय वजन ठरवलं जातं. त्यामुळे महाराष्ट्रात कुणालाही विचारा की, माझं राजकीय वजन कमी झालं की जास्त झालं? अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे जेवढ्या जबाबदाऱ्या नव्हत्या, त्याहून अधिक विभागाच्या जबाबदाऱ्या सध्या तुमच्याकडे आहेत. राज्यातील सर्व काम तुमच्याकडून करून घेतलं जातंय, पण मुख्यमंत्रीपदी दुसरं कुणीतरी बसलंय, असं आम्ही मानायचं का? कारण राज्यात तसाच संदेश जातोय, असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, “जे लोकं बाहेरून सरकारकडे पाहतात, त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे. कारण मी यापूर्वी मुख्यमंत्री पदावर काम केलं आहे. आता मला केवळ सहा विभागाचं काम पाहावं लागतं. पण मुख्यमंत्र्यांना सर्व विभागांची कामं पाहावी लागतात. कारण ‘रुल्स ऑफ बिझनेस’नुसार जवळपास सर्वच विभागांची कागदपत्रे मुख्ममंत्र्यांकडे जातात.

हेही वाचा- …अन् शरद पवारांनी थोडक्यात उरकलं भाषण, प्रकृतीचं कारण देत म्हणाले, “आज मला…”

दुसरीकडे, पालकमंत्री म्हणून माझ्याकडे सहा जिल्ह्यांचीच जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांकडे सर्व जिल्ह्यांची जबाबदारी असते. पण आमच्या सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर माझ्याकडील जबाबदाऱ्या इतर मंत्र्यांकडे दिल्या जातील. पण माझं असं मत आहे की, सरकार चालवणं हा सामूहिक प्रयत्न असतो. त्यामुळे माझ्यावर खूप जास्त जबाबदाऱ्या आहेत, असं मला वाटत नाही. याउलट मी या जबाबदाऱ्यांचा आनंद घेतोय, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadanvis on political weight rmm