राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा सुरू असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपासून जोरदार राजकीय घडामोडी सुरू होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं म्हटलं होतं. त्यांनंतर आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवाग हालचाली सुरु असल्याचे दिसून येत होते. त्यावरून भाजपा आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. अखेर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. भाजपाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून तसेच सर्वसामान्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत आणि वेगवेगळे अंदाजही लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत भाजपाने निवडणुकीतून माघार घेण्याचे कारण सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात आमच्याकडे बराच विचार झाला, विशेषता कार्यकर्त्यांचं मत होतं आम्ही निवडणूक लढवली पाहिजे, मुंबई युनिटचंही मत होतं आम्ही निवडणूक लढवली पाहिजे. मुरजी पटेलांसारखा उमेदवार ज्यांनी अपक्ष असूनही ४५ हजारांपेक्षा अधिक मतं घेतले तो उमेदवार आम्ही उभा केला होता. ..त्यामुळे आम्हाला निवडून येण्याची पूर्ण खात्री होती. तथापि काहींनी आम्हाला विनंती केली, काही ज्येष्ठांनी विनंती केली. तुम्हालाही कल्पना आहे की राज ठाकरे किंवा शरद पवार असतील. काहींनी समोरून केली तर काहींनी मागून केली. आता मागून कोणी केली हे विचारू नका, राजकारणात सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. पण ज्यांनी कोणी केली, त्यावर विचार करून मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोललो, आमच्या वरिष्ठांशी बोललो. आमच्या टीमशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर हा निर्णय आम्ही घेतला आहे.”
तर “हा निर्णय काही आम्ही पहिल्यांदा घेतलेला नाही. आर.आर.पाटील ज्यावेळी गेले होते तेव्हाही आम्ही असा निर्णय घेतला होता. पतंगराव कदम गेले होते तेव्हाही आम्ही असाच निर्णय घेतला होता. त्यामुळे हा काही पहिल्यांदा घेतला निर्णय नाही. काही लोक छोट्या-छोट्या मनाचे असतात. त्यामुळे तुम्ही कसाही निर्णय घेतला तरी ते त्या संदर्भात बोलत असतात. पण आता ते जे काही बोलले आहेत, त्याला उत्तर ग्रामपंचायतीच्या निकालानेच दिलं आहे. हे खरं आहे भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले. कारण ते पूर्ण लढण्याच्या मूडमध्ये होते. पण शेवटी नेते म्हणून आपल्याला काही प्रथा, परंपरा पाळाव्या लागतात. परिस्थितीत संवेदनशील निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून कधीकधी कार्यकर्त्यांनी नाराजी पत्कारूनही असे निर्णय करावे लागतात, तेव्हा मी केला आहे.” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
पाहा व्हिडिओ –
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं होतं. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकारपरिषदेत ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं. यानंतर भाजपाच्या गोटात हालचालींना वेग आला होता. सकाळपासून भाजपाच्या बैठका सुरू होत्या आणि अखेर दुपारी भाजपाने निवडणुकीत माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज भाजपाला राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग होता. असं म्हणत भाजपावर टीका केली आहे. यावर भाजपाकडून प्रत्युत्तरही देण्यात आलं आहे.