सातारा : कोयना कांदाटी खोऱ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे बंधारे या ठिकाणी बांधण्याचे व कोयना धरणातील गाळ काढण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.श्री उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त दरेगावी (ता. महाबळेश्वर) आले होते. पाच दिवसांचा दौरा आटोपून मुंबईच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधाऱ्यांच्या योजनांची पाहणी केली. विविध विकासकामांचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. ज्या गावांमधून नव्या बंधाऱ्यांची मागणी होती, त्या ठिकाणांचीही श्री. शिंदे यांनी पाहणी करून तेथील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित होते. कोयना कांदाटी परिसरात शेती व पिण्यासाठी वर्षभर पाणी पुरेल, असे नियोजन आहे. सिमेंट व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले जाणार आहेत.

कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात ज्या ठिकाणी पाणी कमी झाले आहे आणि भूभाग उथळ झालेला आहे, अशा ठिकाणी दोन वर्षांमध्ये गाळ काढण्याचे काम झाले होते. यावर्षीही त्याठिकाणी पुन्हा गाळ काढण्यात यावा, असे निर्देश या वेळी दिले, तसेच महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान होत असलेल्या ‘महापर्यटन महोत्सवा’ संदर्भात या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. कोयना जलाशयाच्या परिसरातील १०५ गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजना मंजूर करून घेतल्याने त्याठिकाणी शाश्वत जलसंपत्तीचा विकास होणार आहे. यामध्ये कोल्हापुरी बंधारे, उपसा सिंचन योजना, सिमेंटचे साखळी बंधारे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.