“असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गयी देखो और सुधार करो” असं म्हणत अर्थसंकल्प वाचत असताना अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला टोला लगावला. शेतकऱ्यांसाठी काय तरतुदी केल्या हे सांगत असताना अजित पवार यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळी असल्याचा उल्लेख केला. परंतु त्यांच्याकडून झालेली चुक त्यांच्या ध्यानात आली नाही.

“असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गयी देखो और सुधार करो” असं अजित पवार यावेळी म्हणाले. याचा अर्थ अपयश हे एक आव्हान आहे ते स्वीकारा आणि काय कमतरता राहिली याचा विचार करा आणि त्याप्रमाणे सुधारणा करा असा आहे. परंतु ही कविता हरिवंशराय बच्चन यांची असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या कवितेबाबत खुद्द ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दोन वर्षांपूर्वी ट्विट करून ही कविता हरिवंशराय बच्चन यांची नसल्याचं सांगितलं होतं. तसंच त्यांनी ही कविता कवी सोबनलाल द्विवेदी यांची असल्याचं म्हटलं होतं.


महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी निरनिराळ्या घोषणा केल्या.