छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला (Fort Shivneri ) इथे शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यानिमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती, मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) हे सुद्धा उपस्थित होते मात्र शासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत.
मराठा आरक्षण विषयक विविध मुद्द्यांवर राज्य सरकार विरोधात मुंबईत आझाद मैदानात २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी याआधीच जाहिर केलं होतं. शिवजयंती निमित्त संभाजीराजे यांनी शिवनेरी किल्ल्यावर हजेरी लावली पण शासनाने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत, तिथल्या व्यासपीठावर उपस्थित राहिले नाहीत. यावरुन संभाजीराजे यांची राज्य सरकारवरची नाराजी स्पष्टपणे दिसून आली आहे. या निमित्ताने २६ फेब्रुवारीपासून सुरु होणारे संभाजीराजे यांचे उपोषण आंदोलन हे आणखी तीव्र असेल हे स्पष्ट होत आहे.
दरम्यान केंद्र सरकारनेच मराठा आरक्षणसंदर्भात कायदा करून आरक्षण देण्याचा प्रयत्न करायला हवा. आम्ही आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत,असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. संभाजीराजे यांनी उपोषण आंदोलन करु नये अशी विनंतीही अजित पवार यांना भाषणा दरम्यान जाहिरपणे केली.