सातारा पालिकेत घंटा गाडीचे १५ लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी दोन लाख तीस हजार रुपयांची लाच घेताना पालिकेचे उप मुख्याधिकारी संचित धुमाळ यांना पालिका कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के व निरीक्षक जगताप यांनी केली.

कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडी ठेकेदाराकडून पंधरा लाख रुपयांचे देयक मिळण्यासाठी पालिकेचे उप मुख्याधिकारी संचित धुमाळ,आरोग्य निरीक्षक गणेश टोपे व प्रवीण यादव (रा.सातारा) यांनी लाचेची मागणी केली होती. आज कार्यालयातच दोन लाख तीस हजाराची लाच घेताना धुमाळ यांना पकडण्यात आले आहे. पालिकेच्या कार्यालयातच हे प्रकरण घडल्याने सातारा शहरात दुपारी खळबळ उडाली. याबाबत तपास सुरू आहे. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु असल्याची माहिती उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली. तक्रारदाराच्या तक्रारीची खात्री झाल्यानंतर  ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या दोन अन्य अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले असल्याची व पुढील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Story img Loader