सांगली : अलीकडच्या काळात योग्य नेतृत्वाअभावी जिल्हा विकासापासून वंचित राहिला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार जनता स्वीकारताना दिसत आहे. यापुढील काळात रखडलेला विकास साधण्यासाठी आवश्यक तो निधी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील माजी आमदार शिवाजी नाईक, विलास जगताप, राजेंद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती तमणगोंडा रविपाटील, सांगलीचे मुन्ना कुरणे, भाजयुवा आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पाटील आदींनी मंगळवारी सायंकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, खा. प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘सांगली जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. वसंतदादा पाटील यांचा जिल्ह्याच्या व महाराष्ट्राच्या विकासात मोलाचा वाटा आहे. सांगली जिल्ह्यात विकासाला निधी कमी पडू देणार नाही. पक्षबांधणीवर भर द्या, नवा जुना असा भेदभाव मी कधीच करीत नाही. सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाते. राष्ट्रवादी हा केवळ पक्ष नसून, एक कुटुंब आहे. एकसंघ काम करून राज्याला एका उंचीवर घेऊन जाऊ, असे ते म्हणाले.

या वेळी स्वागत व प्रास्ताविक करताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले, ‘सांगली जिल्ह्यातील दहशतीच्या राजकारणाला काही वर्षांपूर्वीच पूर्णविराम मिळाला आहे. जाणीवपूर्वक विकास रखडलेला आहे. सहकार तत्त्वावरील संस्था अडचणीत आहेत. बेरोजगारी मोठी आहे हे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रयत्न केले, तर त्याला निश्चित यश मिळेल.’

या वेळी आ. शिवाजी गर्जे, आ. इद्रीस नायकवडी, सांगली जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.