करोनावर काही देशांमध्ये लसींचा बूस्टर डोस दिला जात आहे. यामध्ये दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिसऱ्यांदा हा डोस दिला जात आहे. यामुळे अतिरिक्त सुरक्षा मिळते, असं मानलं जातं. सिरम इन्स्टिट्युटचे अध्यक्ष अदर पूनावाला यांनी देखील करोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिन्यांत तिसरा बूस्टर डोस घ्यायला हवा, असं मत व्यक्त केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता राज्यात बूस्टर डोसची चर्चा सुरू झालेली असताना यांदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात नेमके बूस्टर डोस कधी दिले जाणार? याविषयीचं नियोजन सांगितलं आहे. पुण्यात करोनासंदर्भातल्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुण्यातील करोनाच्या परिस्थितीची माहिती सांगताना अजित पवार यांनी लसीकरणाविषयी माहिती दिली. “पुणे जिल्हा आणि शहरामध्ये पहिला डोस देण्याऐवजी ज्यांचा पहिला डोस झालाय, त्यांना दुसरा डोस देऊन त्यांचं लसीकरण पूर्ण करायचं. त्यानंतर राहिलेल्या लोकांना पहिला डोस द्यायचा”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
बूस्टर डोसचं काय होणार?
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी बूस्टर डोसविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. “काही आमदारांनी सांगितलं की आता ज्यांनी दोन डोस घेतले, त्यांना तिसरा बूस्टर डोस द्या. सध्या सगळ्यांना पहिले दोन डोस देऊ. त्यानंतर बूस्टर डोसचा विचार करू. अनेक ठिकाणी पहिला डोस देखील द्यायचं राहिलं आहे. तिसऱ्या बूस्टर डोससंदर्भात राज्य सरकार सहमत आहे. पण १८ वर्षांवरील सगळ्या नागरिकांना दोन्ही डोस झाल्यानंतरच बूस्टर डोस देण्याचा विचार करण्यात येईल”, असं अजित पवार म्हणाले.
वैयक्तिक स्तरावर बूस्टर डोस घेण्यास परवानगी
यावेळी वैयक्तिक स्तरावर खरेदी करून बूस्टर डोस घेण्यासाठी सरकार थांबवणार नाही, असं देखील अजित पवार यांनी सांगितलं. “कुणी स्वत:च्या पैशातून बूस्टर डोस घ्यायचं ठरवलं, तर त्याला नाही म्हणण्याचं कारण नाही”, असं ते म्हणाले.
“…ही तिसऱ्या लाटेबाबत धोक्याची सूचना”, अजित पवारांनी पुण्यात बोलताना दिला इशारा!
बूस्टर डोस आरोग्य सेवकांना सर्वात आधी
ज्या वेळी बूस्टर डोस द्यायला सुरुवात होईल, तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं. “बूस्टर डोससंदर्भात त्या त्या वेळच्या आवश्यकतेनुसार लसीकरण केलं जाईल. जे फील्डवर काम करतात, जे इतरांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांनाच बूस्टर डोससाठी प्राधान्य दिलं जाईल”, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.