भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत पवार कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने अजित पवारांना नोटीस पाठवली आहे. आयकर विभागाने पाठवलेली नोटीस हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पवारांच्या मालमत्तावर कारवाई करण्यासंदर्भातील नोटीस अजित पवार यांना पाठवण्यात आल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. कालच सोमय्या यांनी अजित पवारांकडे एक हजार कोटींहून अधिक बेनामी संपत्ती असल्याचे आरोप केले होते. या प्रकरणामध्ये सोमय्या यांनी अजित पवारांची आई, पत्नी आणि त्याचबरोबर पवार कुटुंबियांच्या जावयाचाही हात असल्याचा आरोप केला होता.
सोमय्या नक्की काय म्हणालेले?
मी दिवाळीनंतर बोलणार होता, पण पवार साहेबांना घाई झालीय, असं म्हणत आपण तीन जावयांचा घोटाळा समोर आणणार असं म्हणालो होतो त्याप्रमाणे आज आपण पवारांचे जावाई मोहन पाटील यांच्या मार्फत झालेल्या व्यवहारांबद्दल भाष्य केलं होतं. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी आलेत. हे पैसे बिल्डरांनी दिले आहेत. हे सर्व सर्व त्यांनी कुटुंबियांच्या खात्यात वळवल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. ए. ए. पवार यांच्याबरोबरच अजित पवार यांनी स्वत:च्या आईच्या खात्यातही हे पैसे वळवले आहेत. मोहन पाटील, वियजा पाटील, सुनेत्रा पवार यांचे सगळे काळे कारभार तिकडनं होतात असंही सोमय्या म्हणाले.
पवार हे नवाब मलिकांना आता पुढे करत आहेत
पवार कुटुंबियांविरोधात होणाऱ्या आयकरच्या कारवाईपासून लक्ष्य विचलित करण्यासाठी शरद पवार हे नवाब मलिकांना आता पुढे करत असल्याचंही सोमय्या म्हणाले आहेत. वानखेडेंच्या पहिल्या लग्नाच्यावेळी ते का गप्प बसले?, सेवेत आले तेव्हा का गप्प बसले?, असा प्रश्न सोमय्या यांनी मलिक यांना विचारला आहे. पवार परिवारानं महाराष्ट्राला खूप लुटलंय, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक रोज उठून दाऊद दाऊद करतात कारण हे नाव त्यांना अत्यंत जवळचं आहे, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला होता.