वाई : पुण्याहून कोल्हापूरकडे सभेसाठी निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातारा जिल्ह्यात शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे सातारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, वाईचे आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करत जंगी स्वागत केले. गर्दीमुळे महामार्गावर अर्धा तास वाहतूक कोंडी झाली. स्वागताची गर्दी पाहून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गाडीतून न उतरता आतच बसून राहणे पसंत केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर दायित्व सभेसाठी पुण्याहून कोल्हापूरकडे जात असताना साताऱ्यात मोठे स्वागत झाले. जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली, क्रेनच्या सहाय्याने भला मोठा पुष्पहार आणि आवाजाच्या भिंती (डीजे) लावून स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदेवाडी, शिरवळ, खंडाळा वेळे, सुरुर, कवठे, जोशीविहिर, भुईंज, पाचवड, आनेवाडी टोल नाका (ता वाई) सातारा शहर परिसरातील सर्वच पदाधिकारी यांनी गर्दी केली होती. तेथून ते कारडकडे रवाना झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे आमदार मकरंद पाटील यांनी शिरवळ येथून खंडाळा आणि आनेवाडी टोल नाक्यापर्यंत स्वतः सारथ्य केले.
हेही वाचा : “सरकारला निजामाचे पुरावे चालतात, पण छत्रपतींचे नाही”, काँग्रेसच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर, म्हणाले…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पुण्यातून साताऱ्यात यायला अजित पवार यांना वेळ लागला तरी मोठ्या संख्येने कार्यकर्ते थांबून होते. स्वागतासाठी उभारलेल्या सभामंडपात सर्व नेते मंडळी उपस्थित होती. मात्र, अजित पवार यांचे आगमन झाल्यावर गर्दीवर नियंत्रण मिळवता मिळवता पोलिसांची दमछाक झाली. अनेक लोकांनी या वेळी पवार यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी एकच धाव घेतली. उपमुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने शिरवळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.