लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर अजित पवार गटाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांनी नरेश अरोरा यांची रणनीतीकार म्हणून निवड केली असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. दरम्यान, २०० कोटींचं कंत्राट अरोरा यांच्या कंपनीला देण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

DesignBoxed ही एक राजकीय प्रचार व्यवस्थापन कंपनी आहे. नरेश अरोरा हे या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. या कंपनीने राजस्थान, कर्नाटकसह अनेक राज्यात काँग्रेससाठी निवडणूक प्रचाराचं व्यवस्थापन केलं आहे. त्यांच्या राजकीय रणनीतीला यशही मिळालं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक काबिज करण्याकरता अजित पवारांनी नरेश अरोरा यांच्या कंपनीला कंत्राट दिले असल्याचं वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीचे ब्रॅण्डिंग आणि रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि अजित पवारांसमोर नरेश अरोरा यांनी मांडली. यावेळी पक्षातील इतर नेतेही उपस्थित होते.

हेही वाचा >> ‘तुम्ही हॉटेल पॉलिटिक्स करणार का?’, अजित पवारांना प्रश्न विचारताच दिलं सूचक उत्तर; म्हणाले, “आम्हाला जे…”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांवर प्रकाश टाकत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाने ९० दिवसांची योजना आखली आहे. अजित पवार यांची प्रतिमा तयार करणे, उंचावणे, प्रशासकीय कौशल्ये, विश्वासार्हता आणि आश्वासने पूर्ण करण्याची वचनबद्धता यासारख्या गुणांचा प्रचारासाठी वापर करण्यावर त्यांचा भर असणार आहे, असंही इंडिया टुडेने वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, विरोधकांच्या खोट्या विधानांकडे दुर्लक्ष करून विकास योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रचारावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला आमदारांना देण्यात आला.

रोहित पवार काय म्हणाले?

“अजित दादांच्या पक्षाने अरोरा नामक व्यक्तिला २०० कोटींचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय. इमेज बिल्डिंगसाठी हे कॉन्ट्रॅक्ट दिलंय. लोकापर्यंत कसं पोहाचयचं, इमेज बिल्डिंगचा हा भाग आहे. अरोरा यांनी त्यांना सांगितलं की मंदिरात जाऊन दर्शन घ्या. याचं क्रेडिट अरोरा यांना द्यावं लागेल. ज्यांना २०० कोटींचं कंत्राट देऊन अजित दादांसाठी स्ट्रॅटेजी बनवली आहे”, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, आज अजित पवारांनी त्यांच्या आमदार आणि नेत्यांसह मुंबईत श्री. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. चांगल्या कामाला आजपासून सुरूवात होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. “१४ तारखेला आमची पहिली रॅली बारामतीमधून आम्ही सुरू करतोय. विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सरकारने घेतलेले निर्णय, योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. चांगल्या कामाची सुरुवात करताना देवाचं दर्शन घेऊन केली जाते. म्हणून आम्ही मुंबईत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतोय”, असं अजित पवार म्हणाले.

Story img Loader