यंदाचं हिवाळी अधिवेशन करोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. अधिवेशनाच्या आधीच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये सुरू असलेल्या सुंदोपसुंदीवरून यंदाच्या अधिवेशनात देखील दोन्ही बाजूंनी खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानावरून चर्चा सुरू असताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

“त्यांना आरोपांशिवाय काहीही सुचत नाही”

अजित पवार यांना पत्रकारांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेविषयी विचारणा केली असता त्यांनी पाटलांना टोला लगावला. “तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेताय, त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरं काहीही सुचत नाही”, असं अजित पवार म्हणाले.

..आणि अजित पवारांनी डोक्याला हात लावला!

“आज तर त्यांनी पार आरोप केले की सगळं तयार आहे आणि आता राज्यात फक्त राष्ट्रपती राजवटच लावायचंच चाललं आहे. आता काय म्हणजे…”, असं म्हणताना अजित पवारांनी डोक्याला हात लावला आणि उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

“१७० आमदारांचा पाठिंबा असूनही लोकशाहीत जर केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाचे इथले प्रदेशाध्यक्ष अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील, तर धन्य आहे. त्यावर न बोललेलंच बरं”, असा टोला यावेळी अजित पवारांनी लगावला.

“…मग मुख्यमंत्रीपदाचा चार्ज आदित्य ठाकरेंकडे द्यावा”, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला!

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

राज्यातील महाविकास आघाडीने राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठी जी कारणे लागतात; त्यातील एकही कारण शिल्लक ठेवलेले नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केली. पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाटील यांनी राज्यपाल आणि सरकार यांच्यातील ताणलेल्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले, राज्यपालांनी निरोप पाठवला असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. याचा अर्थ तुम्ही राज्यपालांचा अपमान करता. राष्ट्रपती राजवट राज्यात लागू करण्यासाठी जी कारणे लागतात; त्यातील एकही कारण शिल्लक ठेवलेले नाही. त्यामुळे राष्ट्रपती आता वाट बघत आहेत.

“त्यांनी तसाच चष्मा लावला आहे”

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आजारपणामुळे अनुपस्थित असल्यामुळे राज्याचं नुकसान होत असून त्यांनी चार्ज आदित्य ठाकरेंकडे द्यायला हवा, असा सल्ला दिला. त्यावर देखील अजित पवारंनी टोला लगावला. “त्याची काही गरज नाही. दर आठवड्याला मुख्यमंत्री कॅबिनेट घेतात. तेव्हा त्या मंत्र्यांकडून ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी जाते. ते करोनाबाबत आढावा बैठक घेतात. इतरही बैठका घेतात. सर्व कामकाज व्यवस्थित सुरू आहे. विरोधकांनी जर तशाच प्रकारचा चष्मा लावला आहे, त्यांना त्या चष्म्यातून तेच दिसतंय तर करायचं काय?” असा खोचक सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

Story img Loader