राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. विरोधकांनी यंदा सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडलेली नाही. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना केलेल्या एका घोषणेला सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरून उत्स्फूर्त दाद देण्यात आली. ती घोषणा होती आमदारांना मिळणाऱ्या स्थानिक विकास निधीमध्ये वाढ करण्याची. पण ही घोषणा होताच आमदारांनी गाडीची देखील मागणी सुरू केल्यानंतर मात्र अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये आमदारांना उत्तर दिलं!
आता आमदार विकास निधी ५ कोटी!
आमदारांना मिळणारा विकास निधी ४ कोटींवरून ५ कोटी करण्याचा निर्णय अजित पवारांनी यावेळी जाहीर केला. “स्थानिक विकास निधी ४ कोटी होता. मी तो ५ कोटी जाहीर करतो. खासदारांना देखील केंद्रानं ५ कोटी द्यायला का कू केली. पण आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रत्येक आमदाराला ५ कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे”, असं अजित पवार म्हणाले.
ड्रायव्हर, पीएचेही पगार वाढवले!
दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी आमदारांसोबत असणारे पीए आणि त्यांचे ड्रायव्हर या दोघांचेही पगार वाढवल्याचं जाहीर केलं आहे. “आमदारांच्या ड्रायव्हरला आत्तापर्यंत १५ हजार रुपये पगार होता, तो आता २० हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच, आमदारांच्या पीएला २५ हजार रुपये पगार होता, तो आता ३० हजार करण्यात आला आहे”, असं अजित पवारांनी जाहीर केलं.
दरम्यान, अजित पवारांनी आमदारनिधी आणि पगारवाढीबाबत घोषणा करताच सत्ताधारी बाकांवरून काही आमदारांनी लागलीच गाडीची मागणी केली. “दादा आता गाडीही हवी”, अशी मागणी अजित पवारांना मागील बाकांवरून ऐकू आली. त्यावर लागलीच अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं.
‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करण्यास राज्य सरकारचा नकार, अजित पवार म्हणाले “केंद्र सरकारनेच…”
“आता इलक्ट्रिक कारची वाट बघू”
अजित पवारांनी गाडीची मागणी करणाऱ्या आमदारांना इलेक्ट्रिक कारची वाट बघण्याचा सल्ला दिला आहे. “आता आपण इलेक्ट्रिक कारची वाट बघू.. ती कितीला येते, ते बघू आणि त्यानंतर त्यावर निर्णय घेऊ”, असं अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांच्या पाठीमागेच बसलेले आदित्य ठाकरे संबंधित आमदारांशी थेट विनोदी संवाद साधताना दिसत होते.