गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या चिपी विमानतळाचं अखेर आज उद्घाटन झालं असून या विमानतळामुळे कोकणवासीयांची मोठी सोय होणार आहे. मात्र, सामान्य कोकणवासीयांसाठी या विमानतळामुळे मोठा फायदा होणार असला, तरी त्याच्या उद्घाटनाच्या आधीपासून हे नेमकं कुणाचं श्रेय? यावरून वाद निर्माण झाला आहे. एकीकडे शिवसेनेकडून विमानतळासंदर्भात जोरदार पोस्टरबाजी केली जात असताना नारायण राणेंनी मात्र या विमानतळाचं श्रेय त्यांचं आणि भाजपाचं असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे हा वाद सुरू झालेला असताना प्रत्यक्ष उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर टोला लगावला आहे.
आपल्या भाषणाची सुरुवातच अजित पवार यांनी “या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया आणि दुसरे केंद्रीय मंत्री नारायण राणे”, अशी केल्यामुळे उपस्थित सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. “खूप दिवसांपासून कोकणवासीयांचं, महाराष्ट्राचं स्वप्न होतं की जगातनं लोक गोवा पाहायला येतात. पण गोव्याच्या तोडीचेच किनारे रत्नागिरी, सिंधुदुर्गाला लाभलेत. त्याला वाव कसा देता येईल. ते स्वप्न आज साकार झालं”, असं देखील अजित पवार यांनी नमूद केलं.
“प्रत्येकानं जबाबदारी पार पाडायची असते”
यावेळी बोलताना अजित पवार यांनी श्रेयवादाच्या राजकारणावर टोला लगावला. “या विमानतळाचा इतिहास खूप मोठा आहे. अनेकांचं त्यात योगदान आहे. कुठलीही गोष्ट एकट्या-दुकट्याने होत नसते. ही सामुदाकिय जबाबदारी असते आणि प्रत्येकानं ती जबाबदारी पार पाडायची असते”, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “विमानतळासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे, अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो”, असं देखील अजित पवार यांनी नमूद केलं.