विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा चांगलाच गाजला. राज्यपालांनी राज्य सरकारला पत्र पाठवून हे घटनाबाह्य असल्याचं सांगितल्यामुळे त्यावर बरीच चर्चा झाली. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुढील अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं राज्य सरकारने आधीच जाहीर केलं आहे. मात्र, त्याआधी घटनातज्ज्ञाशी देखील चर्चा करणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यामध्ये एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

“टोकाची भूमिका न घेता आम्ही…”

राज्यपालांनी आपल्या पत्रामध्ये राज्य सरकारने केलेली मागणी घटनाबाह्य असल्याचं सांगत निवडणुकीसाठी परवानगी द्यायला नकार दिला. या मुद्द्यावर अजित पवारांनी सविस्तर भूमिका मांडली. “राज्यपालांच्या मुद्द्यावर मी सविस्तर बोललो आहे. त्यांनी घटनात्मक बाबी उपस्थित केल्या आहेत. आम्ही बहुमत असूनही त्यावर टोकाची भूमिका न घेता अध्यक्षपदाची निवडणूक त्या दिवशी घेतली नाही. आम्हाला त्या दिवशी निवडणूक घेता येत होती. पण आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही. ते महत्त्वाचं पद आहे. त्यांचा आपण आदर केला पाहिजे. सन्मान केला पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

“तुमच्या पत्रातील भाषेमुळे मी दु:खी झालोय”, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांनी पाठवलं उत्तर! म्हणाले, “माझ्यावर दबाव..”!

“राज्यपालांना समजावण्याचा पुन्हा प्रयत्न करू”

दरम्यान, राज्यपालांची आम्ही पुन्हा भेट घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले. “आम्ही प्रमुख लोक पुन्हा जाऊन राज्यपालांना भेटू, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. घटनातज्ज्ञांचाही सल्ला घेऊ. आता दोन महिने हातात आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

“राज्यपाल नाराज आहेत तर राज्य सरकार…”, राज्यपालांच्या पत्रानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितलं!

चंद्रकांत पाटलांना टोला

राज्यपालांच्या पत्रानंतर राज्य सरकारने समजूतदारपणा दाखवायला हवा, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केल्याबाबत पत्रकारांनी विचाराताच अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. “राज्यपाल महोदयांनी सांगूनही निवडणूक घेतली असती, तर असमजूतदारपणा.. पण आता काही जणांना बोलताना कळतच नाही की समजूतदार पणा काय आणि असमजूतदारपणा काय..आम्ही पुन्हा राज्यपालांना भेटून सांगू. त्यात काय घटनाबाह्य आहे ते आम्हीही समजून घेऊ. त्यांना जे सांगायचंय ते आम्हीही सांगू. त्यांनीही माहिती घ्यावी, आम्हीही घेऊ..आम्हाला त्यांचा आदर ठेवूनच राज्य चालवायचं आहे”, असं अजित पवार म्हणाले.

Story img Loader