राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचे देखील तर्क लावले गेले. त्यानंतर खुद्द शरद पवार यांनीच संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या बैठकीत कशावर चर्चा झाली, याबाबत जुजबी माहिती दिली. मात्र, त्यानंतर देखील या राजकीय भेटीमध्ये राजकीय समीकरणांवर देखील चर्चा झाली असणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आद मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवार यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधानांसोबत राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं सांगितलं. मात्र, राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवार म्हणाले. यानंतर देखील या बैठकीतील इतर मुद्द्यांबाबत तर्क-वितर्क सुरूच आहेत. त्यासंदर्भात आज अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“शरद पवार मला म्हणाले…”

दरम्यान, याबाबत बोलताना अजित पवार यांनी मुंबईत शरद पवारांशी झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. “भेटीविषयी इत्थंभूत माहिती कुणीही सांगत नाही. माझं पवार साहेबांशी बोलणं झालं. ते म्हणाले, महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. मला आणि दिलीप वळसे पाटलांना एकत्रपणे त्यांनी हे सांगितलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“एकदा शरद पवार बोलल्यानंतर…”

दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेविषयी जाणून-बुजून गैरसमज पसरवला जात असल्याचं ते म्हणाले. “जाणीवपूर्वक काही जण अशा प्रकारच्या बातम्या पेरून समाजात गैरसमज निर्माण करण्याचं काम करत आहेत. त्याला काही अर्थ नाही असं माझं स्पष्ट मत आहे. तसेच, एकदा पवार साहेब बोलल्यानंतर आम्ही छोट्या कार्यकर्त्यांनी यावर बोलणं योग्य होणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.

पंतप्रधान मोदींसोबत काय चर्चा केली, बैठकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

१२ आमदारांचा मुद्दा!

दरम्यान, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी अजूनही राजभवनात प्रलंबित असून त्याला मंजुरी कधी मिळणार? यासंदर्भात विचारणा होताच अजित पवारांनी शरद पवार-नरेंद्र मोदी भेटीचा दाखला दिला. “सर्वोच्च नेत्यांना यासंदर्भात भेटायला हवं होतं. तिथे शरद पवार भेटले आहेत. पाहुयात काय होतंय ते”, असं अजित पवार म्हणाले.