राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा नेला. यावेळी शरद पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने चपला देखील भिरकावल्या गेल्या. हा सगळा हायव्होल्टेज ड्रामा तासभर चालल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत आधी आझाद मैदान आणि शनिवारी सकाळी सीएसटीएम रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी मारलेला ठिय्या इथपर्यंत हे नाट्य येऊन पोहोचलं आहे. मात्र, शुक्रवारी नेमके हे आंदोलक अचानकपणे सिल्व्हर ओकवर पोहोचले कसे? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी या सगळ्या प्रकारामागच्या मास्टरमाईंडला शोधून काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कुठलीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती”

“चिथावणीखोर भाषा कुणी वापरली? कुणी त्यांच्या भावना भडकवल्या? नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घातल्या. हे लोक असा विचार करणारे नाहीत. पण कुठलीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती. ते शोधून काढण्याचं काम पोलीस विभागाचं आहे. दिलीप वळसे पाटील यांचं म्हणणं आहे की त्यांनी देखील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. लवकरच कुणी हे केलं याचा छडा लागेल”, असं अजित पवार म्हणाले.

मध्यरात्रीच्या घडामोडी! आझाद मैदानावरून उठवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या!

आधी जल्लोष, नंतर आंदोलन का?

दरम्यान, आधी जल्लोष करणाऱ्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी नंतर सिल्व्हर ओकवर का धाव घेतली? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे. “मला एका गोष्टीची गंमत वाटते. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तिथे गुलाल उधळला गेला. तिथे मिठाई वाटली गेली. खूप मोठं यश मिळवलं असं दाखवलं गेलं. मग एवढं सगळं होत असताना पुन्हा सिल्व्हर ओकवर जाण्याचं काहीच कारण नव्हतं. त्याच्या पाठिमागचं कारण काय? त्यातल्या एकानं म्हटलंय की १२ तारखेला बारामतीला जाणार”, असं अजित पवार म्हणाले.

‘सिल्व्हर ओक’वरील एसटी कर्मचारी आंदोलनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “इथे जे काही घडलं..!”

अजित पवारांची पोलिसांवर नाराजी

दरम्यान, पोलीस यंत्रणा या सर्व प्रकरणात कमी पडल्याचं अजित पवारांनी नमूद केलं. “माझं स्पष्ट मत आहे की पोलीस यंत्रणेचं वेगवेगळी माहिती मिळवण्याचं काम असतं. पण ते लोक कमी पडले हे निर्विवाद सत्य आहे. कारण आंदोलक आले, तिथे मीडियाचे देखील कॅमेरे आहेत. जे घडतं, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मीडियाचं आहे. पण जर हे मीडियानं शोधून काढलं, तर मग पोलीस विभागाच्या संबंधित यंत्रणेला का नाही शोधता आलं? त्याहीबाबत एका वरीष्ठ अधिकाऱ्याला चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यातून वस्तुस्थिती पुढे येईल”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm ajit pawar on st workers protest silver oak mastermind pmw