राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज दुपारी तीनच्या सुमारास एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी काही आंदोलकांनी शरद पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने चपला देखील भिरकावल्याचं दृश्यांमधून दिसून आलं. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून नेतेमंडळी या प्रकारावर प्रतिक्रिया देत आहेत. भाजपाकडून माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराचा निषेध केलेला असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“याच्यामागचा मास्टरमाईंड कोण आहे?”

जे काही सिल्व्हर ओकवर घडलं, ती आपली शिकवण नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. “कुणाच्याच बाबतीत असं घडता कामा नये. मग तो आमचा सर्वसामान्य नागरीक असेल, तो कुठल्याही पक्षाचा असेल किंवा स्वतंत्र विचारांचा असेल. ही आपली सगळ्यांची परंपरा, शिकवण आहे. असं असताना हे जे काही घडलंय, याच्यामागे निश्चितपणे शेवटपर्यंत जाऊन दूध का दूध, पानी का पानी दाखवून देऊ”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “याच्यामागचा मास्टरमाईंड कोण आहे? कोण चिथावणीखोर भाषणं देत होतं?” असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

‘सिल्व्हर ओक’वरील एसटी कर्मचारी आंदोलनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “इथे जे काही घडलं..!”

यात पोलिसांचं अपयश

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी या सर्व घटनेमध्ये पोलिसांचं देखील अपयश असल्याचं ठामपणे सांगितलं. “यात पोलिसांचंही एकप्रकारे अपयश आहेच. ही घटना घडली, तेव्हा तिथे मीडिया देखील आहे. याचा अर्थ इतर काहींना हे माहिती असलं पाहिजे. पोलिसांकडे देखील वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा असते. त्या यंत्रणेला हे माहिती असायला पाहिजे. त्यातल्या एकाने बोलताना म्हटलं आहे की १२ तारखेला पवारांच्या बारामतीत जाऊन तिथे निदर्शनं करणार वगैरे. अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच बाबतीत काळजी घेणं गरजेचं होतं. शरद पवार तर राष्ट्रीय नेते आहेत. त्यांना झेड सुरक्षा आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

“आज मला सुप्रिया सुळेंमध्ये इंदिरा गांधी दिसल्या”, ‘सिल्व्हर ओक’वरील आंदोलनावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी सांगितली ७७ सालची घटना!

“नेता शहाणा नसला, तर त्याचा…”

दरम्यान, या सगळ्या प्रकारावर खुद्द शरद पवारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांनी यावर बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वावर निशाणा साधला. “याविषयी वेगळं काही बोलण्याची आवश्यकता नाही. आज इथे जे काही घडलं, त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याचं कारण नाही. नेता शहाणा नसला, तर कार्यकर्त्यांवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात. पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm ajit pawar reaction on sharad pawar house silver oak st workers agitation pmw