जरंडेश्वर साखर कारखान्याच्या व्यवहारांवरून राज्यात मोठा राजकीय वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून सातत्याने अजित पवारांना यावरून लक्ष्य केलं जात आहे. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे देखील आरोप करण्यात आले. यावरून आता अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून विरोधकांना थेट इशारा दिला आहे. “राज्यात फक्त जरंडेश्वर कारखान्याचाच व्यवहार झालेला नाही. माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, उद्या सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सांगेन”, असा इशाराच अजित पवारांनी दिला आहे.
उद्या पुण्यात जाहीर करणार सगळी माहिती!
यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधकांनाच लक्ष्य केलं. तसेच, उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले. “जरंडेश्वर साखर कारखाना ही केस ईडीकडे आहे. कोर्टात प्रकरण आहे. भाजपाचं सरकार असताना सीआयडी, एसीबीची चौकशी झाली. इओडब्ल्यूचीही चौकशी झाली. सहकार विभागाने निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत देखील चौकशी झाली. राज्यात फक्त जरंडेश्वर कारखाना विकला गेलेला नाही. माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. माझ्याकडे त्याची सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे. त्याची सगळी कागदपत्र देखील माझ्याकडे आहेत. उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेईन. राज्यात सुरुवातीपासून किती कारखाने, कुणाच्या कारकिर्दीत किती किमतीला विकले गेले याची माहिती देईन. काही कारखाने ३ कोटी, ४ कोटी, १२-१५ कोटी अशा किमतीला विकले गेलेत”, असं त्यांनी सांगितलं.
“उभा महाराष्ट्र मला ओळखतो”
दरम्यान, भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी आपण कोणतीही बेइमानी केलेली नसल्याचं प्रतिपादन केलं आहे. “बरेच कारखाने चालवायला देखील दिले जात आहेत. आजही राज्यात १२-१३ कारखाने चालवायला देण्याचं टेंडर निघालं आहे. २०-२५ वर्ष चालवायला दिले जातात अशी वस्तुस्थिती आहे. पण काहीजण जाणीवपूर्वक त्याच त्याच गोष्टी लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करतात. आम्ही प्रत्येक वेळी माध्यमांसमोर जात नाही. मी कमीत कमी माध्यमांसमोर जाणारा आणि वस्तुस्थितीला धरून चालणारा माणूस आहे. माझ्याविरुद्ध काही लोकांनी गरळ ओकण्याचं देखील काम केलं की मी बेईमानी केली. मी ९० सालापासून राजकारणात काम करतोय. उभा महाराष्ट्र मला ओळखतो की मी बेईमान आहे की शब्दाचा पक्का आहे. मी कधीही खोटं बोलणार नाही जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे. माझ्या आयुष्यात मी कधी बेईमानी केली नाही. आमच्या रक्तामध्ये बेईमानी नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
मी शेतकरी, मावळ गोळीबार प्रकरणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला – अजित पवार
“फक्त माझ्या नातेवाईकांबद्दल…”
“आजच प्रेस घेणार होतो, पण आज मला काम आहेत. उद्या प्रेस घेऊन सांगणार आहे. त्यात दाखल्यासहीत सगळं सांगेन. काही बिल्डर, शेतकरी, राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांनीही कारखाने घेतले आहेत. पण त्यांच्याबद्दल बोललं जातं नाही, पण माझ्या नातेवाईकांबद्दल बोललं जातं”, असं देखील ते म्हणाले.