महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या. देवेंद्र फडणवीस यांचं राज ठाकरेंनी घरी स्वागत केलं. तर अमृता फडणवीस यांचं स्वागत शर्मिला ठाकरेंनी केलं.
देवेंद्र फडणवीस हे राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. आता आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.
मागच्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाचं काम चांगलं होण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटमही दिला होता. त्यामुळे राज ठाकरे आणि भाजपा यांच्यातला दुरावा संपला आहे का अशा चर्चा होत होत्या. आज मात्र देवेंद्र फडणवीस यांचं राज ठाकरेंनी निवासस्थानी स्वागत केलेलं पाहण्यास मिळालं. या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली का? हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र गणरायाच्या दर्शनानंतर राजकीय चर्चाही झाल्या असाव्यात अशी शक्यता आहे.