राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. २ जुलै २०२३ हा तोच दिवस होता ज्या दिवशी अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यापाठोपाठ नऊ जणांना शपथविधी देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यानंतर दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. अजित पवार यांच्या बंडानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी मैदानात उतरुन पक्ष बांधणीसाठी तयारी सुरु केली आहे.
शरद पवार यांचा उल्लेख सोमवारपासून ८३ वर्षांचा योद्धा असा केला जातो आहे
शरद पवार हे पक्षबांधणीसाठी बाहेर पडल्यानंतर त्यांचा उल्लेख अनेक कार्यकर्त्यांकडून ८३ वर्षांचा योद्धा असा करण्यात येतो आहे. तसंच सुप्रिया सुळेंनीही त्यांच्या वयाचा उल्लेख केला होता. तसंच मुंबईतही शरद पवार यांचे जे बॅनर लागले होते त्यावरही ८३ वर्षांचा योद्धा निघाला असं लिहिलं गेलं होतं. याविषयी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.
हे पण वाचा- “८२ काय ९२ वर्षांचा झालो तरीही…”, शरद पवार यांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?
“आमच्या शरद पवारांना शुभेच्छा आहेत. त्यांनी १०० वर्षे जगावं, त्यांना जितकी वर्षे राजकारण करायचं आहे करावं. मात्र त्यांच्या काही लोकांना असं वाटतं की ८३ वर्षांचा योद्धा असं म्हणून सहानुभूती गोळा करता येते. आम्ही त्याकडे लक्ष देत नाही.” असं आता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले “राष्ट्रवादीबरोबर आल्याने…”
आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश हा उद्धव ठाकरे गटासाठी धक्का मानला जातो आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांच्या वयावरुन प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.