उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईमधील राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सूचक विधान केलं आहे. नांदगावकर यांना राज आणि फडणवीस यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता उत्तर देताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली.
नक्की पाहा >> Photos: ‘शिवतीर्थ’वर फडणवीसांचं औक्षण, भगवी शाल अन्…; राज ठाकरेंच्या घरी असा झाला उपमुख्यमंत्र्यांचा पाहुणचार
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शिंदे गट आणि भाजपा यांच्यात मंत्रीपदांचं वाटप नेमकं कसं होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असल्यामुळे अद्याप मंत्रीमंडळ विस्तार अधांतरीच राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शक्यता वर्तवल्या जात असताना भाजपाने राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना मंत्रीपद देण्याची ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली होती. ही शक्यता राज ठाकरेंनी फेटाळून लावली असताना आज उपमुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी युती होणार का यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर दिलं आहे.
नक्की वाचा >> “ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून…”; ‘बाळासाहेबांचे शिवसैनिक स्वाभिमानी होते’ म्हणत सुप्रिया सुळेंचा शिंदेंना टोला
राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीदरम्यान आज मनसेचे नेतेही उपस्थित होते. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्येच राज आणि फडणवीस यांची भेट झाली. या भेटीनंतर ‘शिवतीर्थ’बाहेर पत्रकारांच्या प्रश्नांना नांदगावकर यांनी उत्तरं दिली. त्यावेळी, “मनसेने युती किंवा आघाडीमध्ये जाण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे असं वाटतं का?” असा प्रश्न नांदगावकर यांना विचारण्यात आला.
नक्की वाचा >> ‘जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवार होते’ म्हणणाऱ्या केसरकरांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “२०१४ ला मीच…”
य़ा प्रश्नाचं उत्तर देताना, “महाराष्ट्र आणि मुंबई शहरातील एकंदरित परिस्थिती पाहिली तर मनसेसाठी अत्यंत सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. या सगळ्या पक्षांविषयी लोकांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आमच्यासाठी सकारात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे एकला चलोचा आमचा नारा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे,” असं नांदगावकर यांनी सांगितलं.
नक्की वाचा >> “त्यात केसरकरांचा नंबर सगळ्यात वर”; शरद पवारांनी शिवसेना फोडल्याचा आरोप, राणेंसोबतच्या वादावरुन शिवसेनेचा टोला
पुढे बोलताना, “भविष्यात काय होईल, कोण कोणाचा मित्र ठरतो किंवा शत्रू ठरतो हे पवार साहेबांनी महाविकास आघाडी करुन दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर आता जे अचानक भयानक जे बदल घडलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहिलेले आहेत. त्यामुळे नक्की काय होईल हे आता मला सांगता येणार नाही,” असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे.