विधानसभेत आज पुन्हा एकदा अजित पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात जुगलबंदी पाहण्यास मिळाली. राईट टू रिप्लायसाठी अजित पवार जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री ज्या घोषणा करत होते त्यावेळी भाजपचे आमदार टाळ्या किंवा बाकं वाजवत नव्हते असं म्हटलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काय म्हटलं?
आज दोन सत्ताधारी पक्षातले प्रस्ताव होते. तीन प्रस्तावांचं उत्तर या दोघांनी मिळून दिलं. त्यावेळी मी बघत होतो की उपमुख्यमंत्री अत्यंत आक्रमकपणे बोलत होते. मुद्दे मांडत भाषण करत होते. उपमुख्यमंत्री बोलत असताना भाजपचे आमदार टाळ्या वाजवत होते, बाकडे वाजवत होते. मला एक तुमच्यावर ऑबजेक्शन आहे देवेंद्रजी, एकनाथराव जेव्हा बोलत होते तेव्हा एकाही भाजपच्या आमदाराने टाळ्या वाजवल्या नाहीत. तुम्ही हवंतर टीव्ही पाहा, तानाजी राव गेले त्यांनी आमच्याच लोकांना सांगितलं टाळ्या वाजवा. एवढे महत्त्वाचे प्रस्ताव होते किती लोकांनी टाळ्या वाजवल्या?
अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून काय म्हणाले?
मी चेष्टा करत नाही, मात्र उत्तर देताना काय सांगत होते मुख्यमंत्री? अधिकारी काम करत आहेत, प्रस्ताव पाठवले आहेत. माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे कुठलाही प्रस्ताव मांडत असताना हे मी करणार असं सांगा की. मान्यता देतो, बितो काय? तुम्ही कशाला सांगता कॅबिनेटला पाठवतो वगैरे, हे महाराज उपमुख्यमंत्री असताना रेटून बोलत आहेत. तुम्ही मात्र मागं मागं येत आहात. असं करू नका असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं आहे?
दादा तुमच्या काळात तर आम्ही पाहिलं आहे की तीन पक्ष होते. राष्ट्रवादीचा मंत्री उत्तर देणार असेल तर फक्त राष्ट्रवादीचे लोकं बसायचे बाकी दोन पक्षाचे आमदार बाहेर असायचे. काँग्रेसचा मंत्री बोलणार असेल तर काँग्रेसचे आमदारच इथे बसायचे. मागण्या मान्य करून घेताना तुमच्या मंत्र्यांकडे जबाबदारी असायची की आमदार जागेवर ठेवा आमच्याकडे असं नाही, हे बघा जरा सगळे भाजपचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार बसले आहेत. मुख्यमंत्री बोलत असताना भाजपच्या आमदारांनीही बाकडे वाजवले तुम्ही सिलेक्टिव्ह ऐकायला लागलात असं म्हणत उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे. बाकडे आम्ही प्रत्येक वेळी वाजतो पण अजितदादा तुम्ही सिलेक्टिव्ह ऐकत आहात. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करेन कारण विदर्भाच्या समग्र विकासाचा आराखडा त्यांनी ज्या पद्धतीने मांडला ते खरोखरच अभिमानास्पद आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.