Eknath Shinde pulls actor Salman Khan closer for a photo : सध्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहेत. पण यादरम्यान शनिवारी आणखी एक विशेष क्रीडा कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडला. यामध्ये राजकारण याबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

भाजपाचे खासदार अनुराग सिंह ठाकूर यांनी मुंबईतील एमसीए क्रिकेट स्टेडीयमवर या मैत्रीपूर्ण टी२० क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. टीबी मुक्त भारत मोहिमेअंतर्गत (TB Mukt Bharat campaign) जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा समाना खेळवण्यात आला. अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील लीडर्स इलेव्हन आणि सुनील शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील अ‍ॅक्टर्स इलेव्हन यांच्यात सामना झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता सलमान खान, खासदार सुप्रिया सुळे, अरविंद सावंत आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ हे सध्या ऑनलाइन व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामध्ये अभिनेता सलमान खान आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांबरोबर दिसत आहेत.

अभिनेता सलमान खान आणि एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला सलमान खान हा एकनाथ शिंदे यांच्या शेजारी उभा राहून फोटोसाठी पोज देत आहे. पण थोडा दूर उभा राहिलेल्या सलमान खानला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाताला धरून जवळ ओढताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. यावर सलमान खानच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेला अभिनेता अर्जुन कपूर म्हणाला की, “कोणत्याही प्रकारचा संदेश पोहचवण्यासाठी मनोरंजन, राजकारण आणि खेळ हे तीन आधारस्तंभ आहेत. त्यामुळे आपण सर्वजण इतक्या महत्त्वाच्या वैद्यकीय कारणासाठी एकत्र येऊ शकलो याचा खूप आनंद आहे.”

अभिनेता अर्जुन रामपाल हा देखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. आएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, तो म्हणाला की, “मला वाटते की हा उपक्रम महत्त्वाचा आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेली ही खूप महत्त्वाचा उपक्रम आहे. अनुराग ठाकूर यांनी मला सांगितले की आपल्या लोकसंख्येच्या २८ टक्के टीबीने ग्रस्त आहे. त्यामुळे याबद्दल जागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मला आशा आहे की हा संदेश सर्वांपर्यंत पोहचेल आणि आपण २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारताचे स्वप्न साकार करू शकू”

Story img Loader