महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. चालू आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे आलं तर ते सर्वजण अपात्र ठरतील, असं विधान झिरवळ यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नरहरी झिरवळ म्हणाले, “सत्तासंघर्षाचा निकाल काय येईल आणि कसा येईल? हे कोण ठरवू शकतो? शेवटी सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय आहे. सत्तासंघर्षाचं प्रकरण पूर्णपणे माझ्याशी निगडीत आहे, असं तुम्ही आम्ही म्हणतो. मलाही वाटतं की ते प्रकरण माझ्याकडे येईल. पण ते प्रकरण माझ्याकडेच येईल, हे कोण पक्कं सांगू शकत नाही. यावर न्यायालय निर्णय घेईल.”
हेही वाचा- “संजय राऊतांचा स्वत:चाच उकिरडा झालाय”, शिंदे गटाच्या नेत्याची खोचक टीका
१६ आमदारांचं प्रकरण तुमच्याकडे आलं तर काय होईल? असं विचारलं असता नरहरी झिरवळ म्हणाले, “ते प्रकरण माझ्याकडे येऊ दे तरी, आल्यावर पाहू काय करायचं, आता मी इथून १६ आमदारांना अपात्र म्हणून पाठवलं, तर ते अपात्र होतील.”
हेही वाचा- “मी नाव घेत नाही, अन्यथा मला…”, बाजार समितीच्या निवडणुकीबाबत अजित पवारांचं विधान
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तुमच्याविरोधात गेला तर काय होईल? याबाबत विचारलं असता झिरवळ यांनी पुढे सांगितलं, “माझ्या निर्णयाच्या विरोधात निकाल लागला किंवा माझ्यावर शंका घेतली तर मी चुकीचा निर्णय दिलाय, असं सिद्ध होईल. पण मी घटनेला धरून निर्णय दिलाय… घटनेचा अभ्यास करून १६ आमदारांना अपात्र ठरवलंय. त्यामुळे मी चुकीचा ठरलो तर घटनाच चुकली, असं म्हणता येईल का? म्हणून मी दिलेला निर्णय बरोबरच आहे.”