Sangamner News Update: लोकसभा निवडणुकीत दक्षिण अहमदनगर येथून पराभूत झालेले भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभेतून निवडणूक लढविण्याची चाचपणी करत आहेत. भाजपाने सुजय विखेंना तिकीट देण्यास नकार दिला आहे. मात्र त्यांनी काल (दि. २५ ऑक्टोबर) संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात संगमनेरचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. जवळपास एक मिनिट ते जयश्री थोरात यांच्याबद्दल अपमानास्पद विधान करत होते. त्यांच्या विधानानंतर आता संगमनेर तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांचे बॅनर फाडून निषेध व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धांदरफळ येथील सभेत वसंतराव देशमुख यांच्या अश्लाघ्य विधानानंतर स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेत सभास्थळी धडक दिली. काही महिलांनी थेट स्टेजवर चढून ठिय्या मांडला आणि देशमुख यांनी सदर विधानाबाबत माफी मागण्याची मागणी लावून धरली.

सुजय विखेंच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड

देशमुख यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते रात्री आक्रमक झाल्याचे दिसले. सभेनंतर विखे यांच्याबरोबरचे लोक लोणी गावी परतत असताना त्यांच्या वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली. सभेचे आयोजक व संबंधित वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करून अटक करावी, या मागणीसाठी मध्यरात्रीनंतरही हजारोंचा जमाव पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या देऊन बसला होता. तसेच धांदरफळ येथील सभेठिकाणी लावलेले सुजय विखेंच्या समर्थनाचे बॅनर फाडून टाकण्यात आले आहेत.

एकूणच सदर घटना आणि नंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तालुक्यातील विशेषतः संगमनेर शहरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते. हजारो महिला आणि कार्यकर्त्यांचा जमाव संगमनेर शहरात जमा झाला. नंतर या जमावाने संगमनेर तालुका पोलीस ठाणे गाठून सबंधितांच्या तात्काळ अटकेची मागणी केली. त्यासाठी मध्यरात्रीनंतरही हा संतप्त जमाव पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मारून होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आज, शनिवारीही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

विधानपरिषदेचे आमदार आणि बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी एक्सवर पोस्ट करून संताप व्यक्त केला.

दरम्यान विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी या समाज माध्यमावर आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांनी याच वसंतराव देशमुख यांचा चांगला समाचार घेतला होता. याची आठवण करून देताना या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, सुजय विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, वसंत देशमुखला भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशा लोकांना त्यांची जागा दाखविण्याची.

देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध – डॉ. सुजय विखे

संगमनेर मधील वातावरण पेटल्याच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीनंतर माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की, वसंतराव देशमुख हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे भाषण चालू असताना दोनदा त्यांना कार्यकर्त्यांनी थांबण्याबाबत सुचविले, परंतु ते थांबले नाहीत. त्यानंतर मी माझ्या भाषणाच्या तयारीला लागलो. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे माझे लक्ष नव्हते. असे असले तरी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे देशमुख यांच्यावर ज्या पद्धतीची कारवाई होईल, त्याच पद्धतीची कारवाई आमच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर हल्ले करणाऱ्या लोकांवर देखील केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

कोण आहेत वसंतराव देशमुख ?

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या गावचे रहिवासी असलेले देशमुख हे तालुक्यामध्ये थोरात यांचे पारंपारिक विरोधक आहेत. सुरुवातीला दिवंगत भाऊसाहेब थोरात, त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर ते कायम टीका करत आलेले आहेत. यातून अनेकदा वादावादीचेही प्रकार घडले होते. संगमनेर साखर कारखान्याच्या एका वार्षिक सभेमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. कदाचित वाढत्या वयामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून तसे अलिप्त होते. मात्र काल सुजय विखे यांच्या सभेचे अध्यक्ष स्थान त्यांना देण्यात आले होते. येथेही त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ उठला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Derogatory remark by sujay vikhe activist on balasaheb thorat daughter jayashree thorat tension emerge in sangamner kvg