राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विधानसभा आणि विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना चितपट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही सभागृहांचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असल्याने सभागृहातील प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात कैद होते. याच कॅमेऱ्यात कैद झालेले एक दृश्य महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या ट्विटर खात्यावरून शेअर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय दिसतंय?

सोमवार, २४ जुलैपासून पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला. विधान परिषदेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई निवेदन करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेत घेतल्यानंतर मोदींनी शिंदेंबाबत कौतुक करत ट्वीट केले होते. या ट्वीटची शंभूराज देसाई सभागृहाला माहिती देत होते. शंभूराज देसाई यांच्या मागेच अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार बसले आहेत. अब्दुल सत्तार एक पुडी बाहेर काढतात आणि खातात, असं काँग्रसेने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा >> मुंबईत आता कंत्राटी पोलीस, गृहखात्याच्या निर्णयावर रोहित पवार संतापले; म्हणाले, “नवीन प्रथा…”

महाराष्ट्र काँग्रेसने काय टीका केली?

हा व्हिडीओ शेअर करताना महाराष्ट्र काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. “विधानसभेत चर्चा सुरू असताना सत्तार महोदयांनी थेट पुडी काढून तोंडात टाकली आणि निर्धास्तपणे चघळत बसले. आज विधानसभेत पुडी खाऊन चघळतायत, उद्या तिथे थुंकायलाही कमी करणार नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांना विधानसभा पानाची टपरी वाटते का?”, असं ट्वीट काँग्रेसने केलं आहे.

काँग्रेसच्या या ट्वीटवर नेटिझन्सच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. “या सत्तारसाहेबांना आमदार कोणी केलंय हाच प्रश्न मला पडलाय, विधानसभेत तळमळीने मतदारसंघातले प्रश्न मांडण्याऐवजी तुम्ही गुटखा खात बसलात, पुढच्या वेळी जनता तुम्हाला कायमचं घरी बसवेल. तेव्हा चुना, गुटखा वाटल्यास मद्यपान या सर्व गोष्टीचा आस्वाद घरी बसून घ्यावा याच शुभेच्छा साहेब”, असं एका युजरने म्हटलं आहे.