बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत गंभीर आक्षेप घेतले आहेत. “आम्ही चित्रपटातील कलाकारांकडे चित्रपट प्रदर्शित होण्याआधी दाखवा सांगितलं. त्यानंतर वारंवार विचारणा करूनही तसं झालं नाही,” असं मत बाजीप्रभूंच्या वंशज रतन देशपांडे यांनी व्यक्त केलं. तसेच चित्रपट बघितल्यानंतर आ्हाला जे आक्षेप वाटले ते मांडत असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांच्यासोबत बाजीप्रभूंच्या वंशज अमर वामनराव देशपांडे, किरण अमर देशपांडे इत्यादी उपस्थित होते. ते बुधवारी (१६ नोव्हेंबर) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
रतन देशपांडे म्हणाल्या, “व्हॉट्सॅपसह सोशल मीडियावर अनेक मेसेज येत आहेत. त्यानंतर आम्ही स्वतः हा चित्रपट पाहिला. चित्रपट बघितल्यानंतर आम्हाला जे आक्षेप वाटले, ज्या गोष्टी ऐतिहासिक संदर्भाला धरून नाहीत असं वाटलं त्यावर आमचा आक्षेप आहे. हा आक्षेप नोंद घेण्यासारखा आहे.”
“शिवाजी महाराजांचा उल्लेख सातत्याने अरेतुरेच्या भाषेत”
“छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. असं असताना चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख सातत्याने अरेतुरेच्या भाषेत दाखवला. हे अतिशय खटकणारं आहे आणि चुकीचं आहे. कारण शिवाजी महाराज आपलं आराध्य दैवत आहे. ते असं करणं टाळू शकले असते,” असं मत व्यक्त करत रतन देशपांडेंनी पहिला आक्षेप नोंदवला.
“प्रत्यक्षात हिरडस मावळ येथे कुठेही समुद्र नाही”
रतन देशपांडे पुढे म्हणाल्या, “दुसरा आक्षेप हिरडस मावळ येथे समुद्र दाखवला आहे. प्रत्यक्षात येथे कुठेही समुद्र नाही. तिथे नदी आहे. चित्रपटात तेथून महाराष्ट्र स्त्रिया, मुलींना इंग्रज बोटीतून घेऊन जाताना दाखवलं आहे. मात्र, त्याकाळी मावळमध्ये इंग्रजांचं खरंच इतकं प्राबल्य होतं का? हा मोठा प्रश्न आहे. आम्ही अनेक इतिहासकारांशी चर्चा केली. त्यांच्यानुसार, शिवाजी महाराजांनी त्यावेळी इंग्रजांना थोपवून धरलं होतं. मात्र, चित्रपटात इंग्रज सहजपणे स्त्रियांना घेऊन जाताना दाखवलं आहे.”
“सख्ख्या भावांमध्ये ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली भांडण दाखवलं”
तिसरा आक्षेप नोंदवताना त्या म्हणाल्या, “तिसरा आक्षेप म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे या सख्ख्या भावांमध्ये ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली भांडण दाखवलं आहे. लहानपणाचं भांडण दाखवून त्याला विश्वासघात असं नाव दिलंय. तसेच फुलाजीप्रभूंनी त्यांचा लहान भाऊ बाजीप्रभू देशपांडेंचा विश्वासघात केल्याचं दाखवलं आहे.”
पाहा व्हिडीओ –
“फुलाजीप्रभू देशपांडे यांची प्रतिमा डागाळली”
“त्या दोघांचं भांडण असल्याचा ऐतिहासिक संदर्भ असल्याशिवाय असं दाखवणं योग्य नाही. यामुळे फुलाजीप्रभू देशपांडे यांची प्रतिमा डागाळली आहे. विशालगडावर या दोन वीरबंधूंची समाधी शेजारी शेजारी आहे. ते दोघेही स्वराज्यासाठी, महाराजांसाठी धारातीर्थी पडले. या दोघा भावांमध्ये २०-३० वर्षे वैर होतं आणि ते अचानक एकत्र आले असं होऊ शकत नाही,” असं मत रतन देशपांडेंनी व्यक्त केलं.
“ऐतिहासिक घटना बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही”
“सिनेमॅटिक लिबर्डी काल्पनिक चित्रपटात वापरता येते. मात्र, ऐतिहासिक घटना बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. तो अधिकार कोणालाच नाही. त्यामुळे अशा घटना बदलणं अतिशय चुकीचं आहे. ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणंही चुकीचं आहे,” असे आक्षेप त्यांनी घेतले.
व्हिडीओ पाहा :
“अफजल खान वधावेळी बाजीप्रभू तेथे उपस्थित नव्हते”
रतन देशपांडे पुढे म्हणाल्या, “चौथा आक्षेप म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे त्याक्षणी तेथे उपस्थित नव्हते. मात्र, चित्रपटात बाजीप्रभू तंबूच्या बाहेर हजर असल्याचं दाखवलं आहे. त्यावेळी बाजीप्रभू दुसऱ्या मोहिमेवर होते. शिवा काशिद अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा होती, मात्र चित्रपटात त्या व्यक्तिरेखेला थोडक्यात संपवण्यात आलं आहे. ज्यांनी जो पराक्रम केला तो आपण नाकारू शकत नाही.”
“आपण वाईट गवंडी घेऊन खोटी मंदिरं बांधू का?”
“पाचवा आक्षेप चित्रपटात अफजल खानाला आणण्यासाठी बाजीप्रभूंनी वाईट गवंडी घेऊन खोट्या पद्धतीची मंदिरं बांधली असं दाखवण्यात आलं आहे. अशी मंदिरं बांधणं इतकं सोपं आहे का? देऊन हे आपलं श्रद्धास्थान आहे. आपण वाईट गवंडी घेऊन खोटी मंदिरं बांधू का?” असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला.
“चित्रपट आधी इतिहासकारांना दाखवला होता का?”
त्या म्हणाल्या, “ऐतिहासिक चित्रपट बनवताना इतिहास सल्लागारांची आवश्यकता असते. हा चित्रपट आधी इतिहासकारांना दाखवला होता का? वंशज म्हणून आम्हाला आधी हा चित्रपट दाखवला नाही. प्रत्यक्षात मी फेसबूकवर चित्रपटातील कलाकारांना चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आम्हाला दाखवा असं सांगितलं होतं. तसेच त्यात आमच्या पूर्वजांचा चुकीचा इतिहास घेतला नाही ना इतकंच तपासायचं आहे हेही सांगितलं.”
“आता चित्रपट पाहून आम्ही प्रतिक्रिया दिली”
“त्यानंतर निर्माते तुम्हाला संपर्क साधतील असं सांगण्यात आलं. आम्ही वेळोवेळी विचारणा केली. मात्र, निर्माते किंवा इतर कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. त्यामुळे आता चित्रपट पाहून आम्ही ही प्रतिक्रिया दिली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.