नामदेव जाधव यांनी आपण जिजाऊंचे वंशज असल्याचा दावा त्यांच्या फेसबुक पेज आणि X (पूर्वीचे ट्विटर) यावर केला आहे. तसंच काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवारांवर मराठा आरक्षण प्रकरणी टीका केली होती. आता राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज गोपाल भगवान जाधव यांनी आमदार रोहित पवार यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. नामदेव जाधव हे जिजाऊंचे वंशज नाहीत ते तोतया आहेत असा उल्लेख या पत्रात केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोपाल भगवान जाधव यांनी पत्रात काय म्हटलं आहे?

पत्राचा विषय: जिजाऊंचे तोतया वंशज नामदेव जाधव यांचेबाबत

मी आपणास निवेदन सादर करतो आहे की, सध्या सोशल मीडिया आणि इतर प्रसारमाध्यमांवर नामदेव जाधव नावाची व्यक्ती मी जिजाऊंचा वंशज म्हणून सांगत फिरत असून तो (नामदेव जाधव) स्वतःचा उल्लेख जिजाऊंचा वंशज, लखोजीराजेंचा वंशज करतो. मात्र तो या घराण्याचा वंशज नसून त्याचा आणि लखोजी महाराज जाधव यांचा काहीही संबंध नाही. तो (नामदेव जाधव) जाधव नावाचा व्यक्ती आहे. त्याचा आणि लखोजीराजे जाधव घराण्यातल्या कुठल्याही नाते, सोयर संबंध व वंशावळ याचा उल्लेख नाही. तो फक्त प्रसिद्धीसाठी वंशज असल्याचं सांगून शरद पवारांवर टीका करतो आहे.

आम्ही सर्व लखोजी राजे यांचे वंशज आणि सिंदखेड राजा परिवार आपणास विनंती करतो आहोत की त्याची (नामदेव जाधव) कायदेशीर चौकशी करुन त्याने केलेली फसवेगिरी उजेडात आणावी आणि त्याच्यावर फसवणूक आणि अपप्रचाराचा गुन्हा दाखल करावा. त्याच्यामुळे मूळ राजे लखोजीराव जाधव आणि वंशज यांची नाहक बदनामी होते आहे.

आपला

राजे गोपाल भगवानराव जाधव असं निवेदन असलेलं पत्र आपल्या सह्यांनिशी गोपाल भगवान जाधव यांच्यासह इतर वंशजांनी दिलं आहे.

जिजाऊंच्या वंशजांनी रोहित पवारांना लिहिलं पत्र
जिजाऊंच्या वंशजाचं रोहित पवारांना पत्र

नामदेव जाधव यांनी शरद पवारांवर काय आरोप केला होता?

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनीच कसं मराठा आरक्षण घालवलं? याविषयीचा आरोप नामदेव जाधव यांनी केला होता. ते म्हणाले होते, “शरद पवारांनी तेली आणि माळी जातींचा ओबीसींमध्ये समावेश केला. आमची त्याला काही हरकत नाही. पण मग त्यांचं शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण का पाहिलं गेलं नाही? शरद पवार मुख्यमंत्री असताना जे काही घडलं त्याच्या चौकशीसाठी श्वेतपत्रिका काढावी. २३ मार्च १९९४ हा मराठ्यांसाठी काळा दिवस ठरला आहे. याचं महत्त्वाचं कारण त्याच दिवशी शरद पवारांनी रातोरात १८१ क्रमांक खोडून इतर दोन जातींचा समावेश ओबीसींमध्ये केला. डेस्क ऑफिसरच्या सहीने दोन जाती ओबीसींमध्ये घेतल्या गेल्या. त्यांना तातडीने १४ टक्के आरक्षणही दिलं गेलं आणि त्यानंतर नोकरभरतीही झाली. ओबीसींच्या यादीत तेली आणि माळी समाज घेतल्यानंतर २३ मार्च १९९४ पासून आत्तापर्यंत ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यावर मराठ्यांच्या मुलांचा हक्क होता. आज मराठ्यांची लाखो मुलं बेरोजगार आहेत त्याला कारण हा रातोरात झालेला हा निर्णय आहे. या निर्णयाला शरद पवार जबाबदार आहेत कारण ते मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.”

नामदेवराव जाधव हे प्राध्यापक,लेखक आणि व्याख्याते आहेत. त्यांनी ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ हे पुस्तक लिहिलं आहे. तसंच आपण जिजाऊंचे वंशज आहोत असा दावा त्यांच्या फेसबुक पेज आणि X या सोशल मीडिया साईटवर केला आहे. मात्र ते तोतया असून त्यांची कायदेशीर चौकशी केली जावी अशी मागणी आता जिजाऊंच्या वंशजांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Descendants of king lakhoji jadhav claim that namdev jadhav is not a descendant of jijau demands probe from rohit pawar scj
Show comments