माकपचे नेते नरसय्या आडम मास्तर यांच्याशी आपले वैचारिक मतभेद असले तरी ते गोरगरीब श्रमिकांना शासकीय योजनेतून घरकुले मिळावीत म्हणून पाठपुरावा करीत आहेत. हे काम चांगलेच असून त्यात कोणीही आडकाठी घालण्याचे कारण नाही. या प्रकरणात शासन दरबारी जे आवश्यक आहे, ते सहकार्य करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिली.
शुक्रवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजिलेल्या वार्तालाप कार्यक्रमात देशमुख बोलत होते. आडम मास्तर हे गोरगरिबांसाठी झटणारे प्रामाणिक नेते असून त्यांच्याशी आपली मैत्री आहे. घरकुलांच्या प्रश्नावर आपण स्वत: आडम मास्तर यांची भेट घेऊन पुढाकार घेऊ, असे देशमुख यांनी सांगितले.
आडम मास्तर यांनी यापूर्वी अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे दहा महिला विडी कामगारांसाठी कॉ. गोदूताई परुळेकर घरकुल प्रकल्प राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्याने यशस्वी केला होता. त्यानंतर त्यांनी मोची, अल्पसंख्याक महिलांसह बांधकाम कामगार आदींसाठी सुमारे ४५ हजार घरकुलांचा प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेला केंद्राने तत्त्वत: मान्यता दिली असून तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या राज्य सरकारने हे प्रकरण प्रलंबित ठेवले आहे. तर याच प्रश्नावर काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आडम मास्तर यांच्याकडून घरकुल मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून गोरगरिबांची फसवणूक होत असल्याचा आरोप करीत त्याविरोधात मोर्चा काढला होता. मात्र आडम मास्तर यांनीही त्यास जोरदार प्रत्युत्तर देत प्रतिमोर्चा काढला होता.
या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री देशमुख यांनी घरकुलांची योजना साकार होण्यासाठी आपण आडम मास्तर यांना पुरेपूर सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. या प्रश्नावर कोणीही राजकारण आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले. व्यापा-यांना जाचक ठरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यास भाजप-सेना युतीचे सरकार बांधील आहे. परंतु जोपर्यंत एलबीटी कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत व्यापा-यांनी एलबीटी भरलीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था पार ढेपाळली असून गुन्हेगारीत वरचेवर वाढत होत आहे. रस्त्यावरून पायी एकटय़ा-दुकटय़ा जाणाऱ्या महिलांच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्रही सुरक्षित राहिले नाही. दुसरीकडे पुरुषांकडील मोबाइल बळजबरीने पळवून नेण्याचे प्रकार वाढत आहेत. यात प्रथमश्रेणीतील शासकीय अधिकारीही लुटले गेले आहेत. तर दुसरीकडे पोलीस आयुक्तालयातील काही भ्रष्ट पोलीस अधिका-यांनी शहरात अवैध धंद्यांना मोकळे रान दिल्यामुळे येथील प्रत्येक बाब कमाईचे साधन मानले जात आहे, अशी खरमरीत शब्दांत देशमुख यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्याचा बंदोबस्त आपणास स्वत:लाच करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा