प्रसिद्ध चॉकलेटिअर आणि शेफ वरुण इनामदार यांचे हे चॉकलेटी रसग्रहण! आजच्या लेखात थोडं स्मरणरंजन.. लहानपण गोड करणाऱ्या रंगीत खजिन्याचं.. अर्थात अस्सल देसी शुगर कँडीजबद्दल थोडंसं.
आज थोडं आठवणींच्या गावात जाऊ या. थोडं वेगळ्या रस्त्यानं. चॉकलेट इंडस्ट्रीला समांतर तेवढय़ाच मोठय़ा शुगर कन्फेक्शनरी इंडस्ट्रीबद्दल बोलू या. हे असे काही शब्द वापरले तर अवघड वाटतं. पण त्या आंबट-गोड, रंगीबेरंगी गोळ्या आठवतायत का.. लहानपणी आपण कितीतरी चघळलेल्या होत्या त्या.. त्याबद्दल बोलू या आपण. शुगर कँडीजबद्दल.
पसंतीला शेवट उरणार नाही, असा खजाना मी तुमच्यासमोर रिता करणार आहे. हा खजाना अगदी स्वस्तातला आहे. रस्त्यावर, एसटी डेपोमध्ये, वाण्याच्या दुकानात वा आणखी कुठेही सहज उपलब्ध होणारा! प्रौढपणातही निज शैशवास जपणारा. गणेश चतुर्थी येण्यास अद्याप खूप अवकाश आहे. पण मला ते गणपतीचे दिवस आठवताहेत.. त्या गणरायाच्या मूर्तीसमोर बसूनच मी या खजान्यातील साखर फुटाण्यांच्या प्रसादाचा आनंद लुटला आहे. कुणाचं लक्ष नाही बघून मी माझे खिसे साखरफुटाण्यांनी भरून घ्यायचो आणि पुन्हा प्रसादासाठी हात पुढे करायचो.
कुटुंबासमवेत दूरच्या गावाला एसटीतून पळती झाडे पाहत मी सीटवर बसून थकून- कंटाळून गेलो की, कुठल्या तरी थांब्यावर वा आगारात थांबलेल्या बसच्या खिडकीतून विविध रंगांनी माखलेला हात आत यायचा. त्या हातात तशीच रंगीबेरंगी ‘शुगर कँडीज’ असायच्या. मग काय, किती खाऊ न् किती नको होऊन जायचे. ‘शुगर कँडीज’ विशेष करून ‘रावळगाव कँडीज’नी माझ्यावर जी भुरळ पाडली, ती अजूनही कायम आहे. कडक उन्हाळ्यातील प्रवासात जाणवणाऱ्या थकव्यावर रामबाण इलाज म्हणून अशा कँडीज अनेकांच्या उपयोगी येतात. ‘मोशन सिकनेस’ असणारे आजही या गोळ्यांचा वापर इलाज म्हणून करतात. अननस, संत्रे, रासबेरी आणि लिंबाच्या रसाने भरलेल्या त्याभोवती साखरेचा पुरेपूर लेप असलेल्या कँडीज विविधरंगी आवरणात पाहिल्या की त्या खाण्याचा मोह अजूनही आवरत नाही.
याशिवाय फळांच्या आकारातील, रंगेबेरंगी कँडीज आठवताहेत? त्या काचेच्या बरण्यांमध्ये भरलेल्या असायच्या आपल्या जवळच्या किराणावाल्याकडेही मिळायच्या. आजही अनेक छोटय़ा दुकानांमधून त्या उपलब्ध आहेत. या कँडीजना कोणताही ब्रँड नाही. किंबहुना त्यांना तशी ब्रँडची गरजही नसते. त्या हातोहात खपल्या जातात. छोटे दोस्त ते मटकावण्यासाठी तुटून पडतात. अशा कँडीज बच्चेकंपनीच्या हातात पडाव्यात म्हणून अहोरात्र राबणारे हात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता राबत असतात आणि रास्त दरात तुमच्या-आमच्या जिभेचे लाड पुरवत असतात.
या साऱ्यांच्या गर्दीत ‘पॉपिन्स’ हे नाव माझ्या जिभेवरून घरंगळतंय! अनेक रंगांतील या गोल गोल छोटय़ा गोळ्या. त्यातील फळांचा रसाचा ,स्वाद.. तोंडाला पाणी सुटलं. पॉपिन्स आणि दुसऱ्या ‘कोला फ्लेवर्ड’मधील ‘रोला कोला’ या दोन गोळ्यांशिवाय बालपण गेलेले फार कमी मंडळी असतील. याशिवाय ‘पार्ले मँगो बाइट’ आंब्यांच्या आकारातील कँडी आणि तितकीच गोड, आठवली? नक्कीच. अशा कँडीजच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या अनेक कंपन्यांपैकी रावळगाव ही त्यातील महत्त्वाची कंपनी आजही साऱ्यांची लाडकी आहे. ‘रावळगाव’ने चवीत नानाविध ढंग आणले. ‘पानपसंद’ हा त्यातीलच एक. पानाचा स्वाद असलेली कँडी. अस्सल भारतीय फ्लेवर. गोळीमध्ये पानाचा स्वाद आणायची कल्पनाच भारी. यात आणखी भर म्हणून ‘मँगो मूड’च्या आस्वादाने अनेकांना भुरळ घातली. या साऱ्यांचा प्राथमिक ग्राहक म्हणजे रंग-चवीला झटकन भुलणारे चिमुकले आणि त्यांच्या सहज हातात पडेल असे ठिकाण म्हणजे वाण्याचं दुकान.
शुगर कँडीच्या देशी ब्रँड्समध्ये जिऱ्याचा स्वाद असलेली ‘स्वाद कँडी’ आठवतेय का? तोदेखील अस्सल देसी स्वाद. सिगारेटच्या आकारातील ‘फँटम सिगारेट’ अनेकांना आठवेल. या सिगारेट पिण्याऐवजी (की फुंकण्याऐवजी) अनेक जण चघळत बसायचे. त्यातला मी एक होतो. या सिगारेटच्या गोळ्या आजही दुकानांमध्येही आणि ई-कॉमर्स साइटवर उपलब्ध आहेत बरं का!
या कँडीजची जादू ग्राहकांवर एवढी होती आणि त्याचा भारतीय बाजारपेठेत विस्तार एवढा होता की काही विदेशी कंपन्यांनीही या क्षेत्रात उडी घेतली. ‘कँडीज’मध्ये वेगवेगळे स्वाद मिसळून त्यांना नवनवे रूप देण्यासाठी नेस्ले कंपनीनेही स्पर्धेत उडी टाकली. ‘नेस्ले फॉक्स कँडी’ पारदर्शी आणि रंगीत. मिंट आणि ब्लॅक करंटच्या स्वादात या कँडीज उपलब्ध आहेत. याशिवाय ‘हारिबो’च्या स्टारमिक्स आणि ‘सिम्पकिन्स’च्या मिश्र फळांच्या उदाहरणार्थ रास्पबेरी, क्रॅनबेरी, सफरचंद कँडीज. खरंच शुगर कँडीजमध्ये केवढं वैविध्य आणि किती पर्याय आहेत.. पसंतीला काही अंतच नसलेला हा खजिना आहे.
– वरुण इनामदार
(अनुवाद : गोविंद डेगवेकर)