जालना : गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालास नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला तरी नवनिर्वाचित खासदार डाॅ. कल्याण काळे आणि भाजपचे पराभूत उमेदवार रावसाहेब दानवे आतापर्यंत दोन वेळेस समोरासमोर आले तरी त्यांच्यात विकासकामांविषयी चर्चा मात्र होऊ शकली नाही.
खासदार डाॅ. काळे यांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांवर यासंदर्भात सांगितले की, एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकदा आम्ही दोघे एकत्र आलो होतो. संसदेचे अधिवेशन सुरू हाेण्याचा तो पहिला दिवस होता. विमानाच्या प्रतीक्षेत आम्ही दोघे एकाच ठिकाणी बसलो होतो. त्यावेळी ‘संसदेच्या अधिवेशनासाठी गेला नाहीत का ?’ असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारला. अधिवेशनाचा पहिलाच दिवस असून, आज आपण निघत आहोत, असे त्यांना आपण सांगितले.
विमानतळावर आमचे फारसे आणि कोणत्याही विषयावर बोलणे झाले नाही. आम्ही बसलो असतानाच त्यांच्या पक्षाचे बाहेरच्या राज्यातील एक खासदार तेथे आले. त्यामुळे आमचे बोलणे असे काही झालेच नाही. जालना लाेकसभा मतदारसंघाचा विकास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. रावसाहेब दानवे या भागाच्या विकासासाठी परिषद घेणार असतील तर त्यात चुकीचे काही नाही. सलग पाच वेळेस ते खासदार राहिले असून, विकासासाठी परिषद घेण्याचा त्यांना अधिकार आहे, असे डाॅ. खासदार काळे म्हणाले.
जालना-जळगाव दरम्यान मंजूर नवीन रेल्वे मार्गाच्या संदर्भात खासदार डाॅ. काळे म्हणाले, यासाठी अर्थसंकल्पात किती तरतूद झाली हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भूसंपादन झाल्यावर या प्रकल्पाच्या कामास गती मिळेल, असेही डाॅ. खासदार काळे म्हणाले.