तेलबिया उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याची घोषणा हवेतच..
प्रदीप नणंदकर
लातूर : एकेकाळी २५ लाख हेक्टरवर असलेले सूर्यफूल हे सध्या दोन ते सव्वादोन लाख हेक्टरापर्यंत खाली घसरले आणि आता त्याचे बियाणेही मिळणे कठीण झाले आहे. एक हजार रुपये किलो दर दिला तरी बियाणेच उपलब्ध नसल्याने तेलबिया उत्पादनात स्वयंपूर्ण होऊ, या घोषणेचा पुरता बट्टय़ाबोळ झाला आहे. या अवस्थेला शासन धोरणेही कारणीभूत असल्याचे दिसते.
भारतात १९६७ साली रशियातून सूर्यफुलाचे बियाणे सुधारित वाण म्हणून आले. १९६४ सालापर्यंत देशात २५ हजार हेक्टरवर सूर्यफुलाचा पेरा सुरू झाला. सूर्यफूल हे आपत्कालीन पीक म्हणून ओळखले जाऊ लागले. खरीप किंवा रब्बीचा हंगाम वेळेवर सुरू झाला नाही आणि पेरण्या लांबल्या तर सूर्यफुलाचा पेरा करता येऊ शकतो, हे शेतकऱ्यांना कळले होते. ऊस नेण्यास कारखान्याने उशीर केला आणि हंगामाचे सूत्र बदलले तरी सूर्यफुलाची पेरणी होते. १०० किलो सूर्यफुलातून ४० ते ४२ किलो तेल निघते आणि त्याचे पोषण मूल्यही अधिक असते. त्यामुळे बाजारपेठेतही त्याला अधिक मागणी आहे.
बियाण्याचा इतिहास काय?
भारतात बंगळुरू येथील संशोधन केंद्रात १९७७ मध्ये पहिले सूर्यफुलाचे ‘बीएसएच वन’ हे संकरित वाण तयार झाले. त्यानंतर देशभरात खासगी आणि शासकीय यंत्रणांनी सूर्यफुलाचे संकरित सुमारे दोनशे वाण तयार केले. त्याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी २००५ पासून सूर्यफुलाचा पेरा २५ हजार हेक्टरवरून २५ लाख हेक्टपर्यंत वाढवला. सूर्यफुलाचा बाजारभाव पाच हजार रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे सूर्यफुलाचे उत्पादन घेणे शेतकऱ्याला परवडेनासे झाले. याच काळात मधमाश्यांची संख्याही कमी झाली. परिणामी परागीकरणच होत नसल्याने उत्पादन घटले. सूर्यफुलाची जागा सोयाबीनने घेतली. सोयाबीनचे उत्पादन हेक्टरी २४ dक्वटल तर सूर्यफुलाचे उत्पादन हेक्टरी बारा dक्वटल होते. मात्र, सोयाबीनमध्ये अधिकाधिक १८ टक्के तेल आहे, तर सूर्यफुलात ते ४० ते ४२ टक्के होते. तेही पुढे २० टक्क्यांपर्यंत खाली आले. बाजारपेठेत त्याला दिला जाणारा भाव परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनीही सूर्यफुलाकडे पाठ फिरवली. सध्या बाजारपेठेत सूर्यफूल पेरणीसाठी बियाणेच उपलब्ध होत नसल्याचे शेतकरी सांगतात. बियाणे उत्पादक कंपन्यांनीही आता सूर्यफूल बियाणे घेण्याची प्रक्रियाच थांबवली असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
शासनाने आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज
हैदराबाद येथील सूर्यफूल संशोधन केंद्रात ३००० पेक्षा अधिक वाण आहेत. लातूर येथील गळीत संशोधन केंद्रामध्ये १००० पेक्षा अधिक वाण, अकोल्यात ७००, राहुरीत ५०० असे वाण उपलब्ध आहेत. मात्र, त्यांनी बियाणे उत्पादन केले तर ते विकले जाईलच याची खात्री नाही. तुटपुंज्या अनुदानात बियाणे विकले जाण्याच्या भीतीपोटी कृषी विद्यापीठेही या क्षेत्रात काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे सूर्यफूल बियाणे मिळेनासे झाले आहे. आता शासनाने त्यात आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज आहे.
-डॉ. एम के घोडके, प्रमुख शास्त्रज्ञ, गळीत संशोधन केंद्र, लातूर
बियाणांचा दर्जा, शुद्धता हे नेहमीच चर्चेचे विषय. कृषी क्षेत्रातल्या विकासाबरोबरच नवी आव्हानेही त्यातून डोकावतात. त्याच्या आढाव्यासह बियाणांचा सर्वस्पर्शी वेध घेणारी ‘शुद्ध बिजापोटी’ वृत्तमालिका आजपासून..