धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा येथील प्रसिद्ध उद्योजक देवदत्त मोरे यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याशी झालेल्या बैठकीत मोरे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी वंचितचे उमेदवार म्हणून देवदत्त मोरे यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे. पुणे येथे वास्तव्यास असणारे देवदत्त मोरे जिल्हा आणि परिसरात यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून परिचित आहेत.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे मोठे प्राबल्य आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांना मिळालेले मतदान वंचितच्या लोकसभा मतदारसंघातील एकूण प्रभावाचा आलेख स्पष्ट करणारे आहे. अर्जुन सलगर यांनी मागील लोकसभा निवडणूक तब्बल ९८ हजारपेक्षा अधिक मते मिळवली होती. सलगर यांच्या तुलनेत देवदत्त मोरे जिल्ह्यातील मतदारांना परिचित आहेत, तरुणांसाठी व्यायाम शाळांचे साहित्य, विविध मंदिर आणि समाज मंदिरांसाठी सढळ हाताने केलेली मदत, वैद्यकीय उपचार त्याचबरोबर लग्नकार्य व इतर अनुषंगिक कार्यक्रमासाठी मोठ्या उत्स्फूर्तपणे देवदत्त मोरे यांनी पुढाकार घेत अनेकांना आर्थिक मदत केलेली आहे. स्वतःच्या खिश्यातील जवळपास ११ कोटी रुपये खर्चून त्यांनी केलेल्या या सामाजिक कामामुळे मोरे यांच्याबद्दल एक सक्रिय समाजसेवक अशी प्रतिमा जनमाणसात आहे. या प्रतिमेचाच लोकसभा निवडणुकीत वंचितला मोठा फायदा होऊ शकतो. मागील निवडणुकीपेक्षाही अधिक मतदान खेचून वंचितने विजयाच्या दिशेने जाण्यासाठी देवदत्त मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचे ठरविले आहे.
हेही वाचा – बच्चू कडूंचा महायुतीवर अमरावतीनंतर रामटेकमध्येही ‘प्रहार’
हेही वाचा – शिंदे गटात प्रवेश करून बबन घोलप यांनी काय साधले ?
मागील पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीला मोठ्या संख्येने मतदारांनी समर्थन दिले आहे. त्यात धाराशिव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २२ हजार ५८ मतदारांनी वंचितच्या बाजूने आपला कल नोंदवला. त्या पाठोपाठ तुळजापूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला २० हजार ४१२ जणांनी मतदान केले. उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात वंचितला १६ हजार ८६९ मतदान मिळाले. बार्शीत १० हजार ४१२, परांडा १२ हजार ५१५, औसा मतदारसंघात १५ हजार ८४५ मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला समर्थन दिले होते. मतदारसंघातील वंचित एकूण बळ यंदाच्या निवडणुकीत वाढविण्याचा प्रयत्न केला जात असून देवदत्त मोरे यांच्या नावावर उमेदवार म्हणून प्राधान्याने चर्चा झाली आहे. एक-दोन दिवसांत उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याची अधिकृत माहिती आहे.