भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रगत देशाच्या बरोबरीने विजेचा वापर होण्याची गरज असून त्यासाठी सध्याच्या दहापट वीज लागेल. ही वीज अन्य स्त्रोतांच्या माध्यमातून नव्हे तर अणुउर्जेद्वारेच उपलब्ध होऊ शकेल. अणुकरारामुळे अणुउर्जा निर्मितीच्या क्षेत्रात देशाची भरीव वाटचाल सुरू आहे. जैतापूर प्रकल्पाला होत असलेला विरोध हा राजकीय स्वरूपाचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. जैतापूर प्रकल्पाला सुरू असलेला विरोध तर राजकीय आहे असेही ते म्हणाले.
बोरावके महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर काकोडकर यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे, उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष अरूण कडू, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डॉ. संजय कांबळे उपस्थित होते.
डॉ. काकोडकर म्हणाले, अणुकरारामुळे तंत्रज्ञान व इंधन आयातीवरील पूर्वीची बंधने नष्ट झाली. पूर्वी अणुभट्टीची क्षमता कमी कमी होत चालली होती. ती आता ९० टक्क्य़ांवर गेली. ७०० मेगावॅटच्या चार अणुभट्टय़ा सुरू आहेत. उच्च तंत्रज्ञानाचे उपकरणे, अधिक क्षमतेचे संगणक मिळू लागले असून लष्कर, अवकाश संशोधन क्षेत्र, आरोग्य व शेती क्षेत्राकरता अणशक्तीचे दालन खुले झाले आहे. तसेच कोळसा, वायू, सौर व जलविद्युत निर्मितीपेक्षा अण उर्जा किफायतशीर असून ती शाश्वतही आहे. प्रगत देशात दरवर्षी दरडोई विजेचा वापर पाच हजार युनिट होतो. या देशांच्या बरोबरीने जाण्यासाठी अणुउर्जाच कामी येईल. जपान व जर्मनीने अणुउर्जा मुक्त होण्याचे जाहीर केले आहे. जर्मनीच्या अर्थकारणावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. तर जपान अजूनही अणुउर्जा वापरतोच आहे. ऑस्ट्रिया व इटली अणुउर्जा वापरत नाहीत. परंतु ते फ्रान्सने तयार केलेल्या अणुउर्जेची वीज वापरतात. अमेरिका अणुवीज केंद्रांची क्षमता वाढवत आहे असा दावाही त्यांनी केला.
थोरियमपासून वीजनिर्मिती करण्याचा कालबद्ध कार्यक्रम भारताने हाती घेतला असून ३०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा अॅडव्हान्सड हेवी वॉटर डिझाईन प्रयोगाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची जागा ठरली नसली तरी लवकरच तो कार्यान्वित होईल. युरेनिअम अणुभट्टी व फास्ट ब्रीडर अणुभट्टय़ांची क्षमता आधी वाढवून नंतर थोरियमचा वापर केला जाईल. न्युक्लिअर पॉवर कॉपरेरेशनने उभारलेल्या अणुभट्टय़ांना सरकारची मदत नसून त्यात गुंतवणूकही नाही. कॉपरेरेशनने स्वत:च्याआर्थिक स्त्रोतातून या भट्टय़ा उभारल्या. या अणुभट्टय़ातून जो कचरा बाहेर पडतो. त्यावर प्रक्रिया करण्यात येते. ९८ टक्के कचऱ्याचा पुनर्वापर होतो. अणुवीज प्रकल्पामुळे किरणोत्सर्ग होतो ही चुकीची धारणा असून नैसर्गिक किरणोत्सर्गापेक्षाही ५०० पट कमी किरणोत्सर्ग अणुभट्टय़ातून होतो. किरणोत्सर्गापासून संरक्षण करण्यावर भर देण्यात आला आहे. असे डॉ. काकोडकर यांनी सांगितले.
फुकूशिमा अपघातानंतर अनेक शंका जगभर घेतल्या जात आहेत. पण फुकुशिमाच्या अणुभट्टीत किरणोत्सर्गामुळे एकही माणूस दगावलेला नाही. दोघांचा मृत्यू त्सुनामीमुळे झाला. भारतात कलपक्कम येथे सुनामी आली. त्याची तीव्रता जपानच्या त्सुनामीइतकीच होती. पण या प्रकल्पाचे कुठलेही नुकसान झाले नाही. भारतालगत अरबी समुद्रात सुमात्रा व मकराना येथे भूकंपाची केंद्र आहेत. तेथे भुकंप होवून सुनामी आली तरी कल्पाकम व जैतापूर येथील प्रकल्पांना धोका होणार नाही. तसेच जैतापूरची जागा ही समुद्रालगत पण उंचावर आहे. भूकंपाचा कुठलाच धोका या प्रकल्पांना असणार नाही. याची दक्षताही घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
जैतापूरसह अन्य अणुवीज प्रकल्पातून तयार होणारी वीज ही स्वस्त आहे. तारापूरची वीज नव्वद पैसे प्रति युनिट दराने तयार होत होती. तर जैतापूरची वीज अडीच ते तीन रुपयांनी तयार होईल. दहा वर्षांत फार झाले तर ही वीज पाच ते सहा रुपये युनिटने मिळेल. त्यामुळे भकंप, सुनामी, प्रदूषण व वीज दर या संबंधी चुकीची चर्चा होत असून ती तथ्यहीन आहे, असेही डॉ. काकोडकर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा