विविध विकासकामे, पांझरा चौपाटी हटाव मोहीम.. अशा वेगवेगळ्या कारणांस्तव धुळे शहरातील भाजपचे आमदार अनिल गोटे आणि महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी यांच्यात रंगलेला कलगीतुरा वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. गोटे यांच्या पुढाकारातून साकारलेली पांझरा चौपाटी हटविण्याचा मुद्दा विरोधकांनी प्रतिष्ठेचा केला आहे. या संदर्भात एक एप्रिलला महसूल मंत्र्यांकडे सुनावणी होणार आहे. गोटेंना शह देण्याच्या नादात विरोधक त्यांनीच मांडलेल्या संकल्पनांचे अनुकरण करतात. उभयतांच्या चढाओढीत धुळेकरांना नवीन रस्ते व पथदीपांची कामे, पांझरा नदीवर पूल, पर्यायी चौपाटी.. अशा अनेक गोष्टी पदरात पडल्या आहेत. विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या पांझरा चौपाटीच्या भवितव्याकडे आता सर्वाचे लक्ष आहे.

धुळे शहरातील राजकारण गेल्या काही वर्षांपासून गोटे यांच्या अवतीभवती फिरते. म्हणजे त्यांनी तशी व्यवस्था केली आहे. सर्व विरोधक एका बाजूला आणि गोटे दुसरीकडे असे अनेकदा झाले. या वादंगात आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार आणि वेगळ्या संकल्पना मांडून विरोधकांना पुरून उरण्याचे कसब गोटे यांनी आत्मसात केले. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे आ. गोटे यांच्याकडे तर महापालिकेची सत्ता राष्ट्रवादीच्या हाती आहे. परस्परांच्या कामांत खोडा घालण्याची एकही संधी संबंधितांकडून सोडली जात नाही. नगरोत्थान योजनेंतर्गत महापालिकेतर्फे सध्या कोटय़वधींची रस्ते आणि दिवाबत्तीची कामे सुरू आहेत. गोटे यांनी एखाद्या कामाची संकल्पना मांडली की, विरोधक त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेतली नसल्याचे आरोप करत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात, हा येथील ताजा इतिहास आहे. पांझरा चौपाटी हटावची त्रयस्थामार्फत रेटलेली मागणी हा त्याचाच एक भाग. पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्ते कामांचे श्रेय घेणे किंवा त्याची उपयुक्तता पटवून देण्याऐवजी चौपाटी कशी निघेल, यावरच विरोधकांचा भर आहे. गोटे यांनी पांझरा नदीत आणखी एक रस्ता (पूल) उभारत धुळेकरांना वाहतुकीचा पर्याय दिला आहे. यामुळे पालिकेची कामे आपसूक झाकोळली जातात. भाजप आमदाराच्या विकास कामांची प्रसिद्धी विरोधक आक्षेप, तक्रारी वा तत्सम कृतीद्वारे करत असल्याचे दिसून येते.

बहुचर्चित पांझरा चौपाटी, पांझरेच्या दुतर्फा प्रस्तावित रस्ते किंवा जलवाहिनी ही कामे डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी राजकारण करू नये, उलट त्यापेक्षा अधिक दर्जेदार कामांतून आपले वेगळेपण सिद्ध करावे, असा सल्ला काही जण देतात. गोटे यांच्या पांझरा चौपाटीला शह देण्यासाठी पालिकेने शिवाजी रस्त्यावर नवीन आकर्षक चौपाटीची उभारणी केली. मुसळधार पावसात चौपाटीवरील काही भाग वाहून गेला होता. तेव्हा गोटे यांनी नित्कृष्ट कामाचा चांगलाच समाचार घेतला.

या नव्या चौपाटीचे गोटे यांनी राजकीय भांडवल सुरू केल्यानंतर विरोधकांनी त्यांची बोलती बंद करायची म्हणून या ठिकाणची दुकाने युद्ध पातळीवर सावरली होती. पांझरा चौपाटीवरील स्टॉलधारकांच्या पुनर्विचार याचिकेची एक एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. पांझरा चौपाटी ही अनेक वर्षांपासून शहरवासीयांच्या पसंतीस उतरली आहे. यामुळे अनेकांच्या भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या चौपाटीशी जोडलेल्या आहेत. सुनावणीत नेमका काय निर्णय होईल, याबद्दल सर्वाना उत्सुकता आहे.

आमदार अनिल गोटे हे राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. धुळे शहराप्रमाणेच विधानसभेतही राष्ट्रवादीवर टीकाटिप्पणी करण्यावर त्यांचा भर असतो. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात लिहिलेली पत्रे विधानसभेत गाजली होती.

विकासकामांची मांदियाळी

आ. गोटे यांनी चालवलेल्या कामांमुळे ते महापालिकेच्या वरचढ ठरतात की काय, अशी धास्ती सत्ताधारी राष्ट्रवादीला आहे. सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या गोटे यांनी आजवर शिवतीर्थ, शहीद अब्दुल हमीद स्मारक, शिवतीर्थ चौकात रणगाडा, नकाणे तलाव भरण्यासाठी शीघ्र कालव्याची उभारणी, ८० फुटी रस्ता आदी कामे केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने शीघ्र कालव्याशी स्पर्धा करण्यासाठी जम्बो कालवा खोदला. दोन मॉडेल रोडची उभारणी व सुशोभीकरणाची कामे केली. समांतर चौपाटी उभारली.