महाराष्ट्रात जे अपेक्षित यश आलं नाही त्याची कारणं शोधून ती दूर कशी करता येतील? विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचं सरकार कसं आणता येईल त्याकडे आपल्याला बघायचं आहे. सध्या, उन्हाळा संपतो आहे, पावसाळा सुरु झाला. पावसाळ्याच्या आधी जे पेरलं जातं तेच पुढे उगवतं. आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे. आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. एकच सांगतो, यशाचे बाप अनेक असतात पण अपयशातही आपण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, पचवायचं असतं आणि नवा निर्धार करायचा असतो. या निवडणुकीत भाजपाचं नेतृत्व मी करत असल्याने मी सांगितलं, की हो या अपयशाची जबाबदारी माझी आहे. पक्ष कार्यकर्ते, मुंबई अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सगळ्यांनी चांगलं काम केलं.

मी निराशेतून बोललो नाही

मी जेव्हा हे सांगितलं की मला मोकळं करुन काम करायची संधी द्या. मी ते निराशेतून बोललो नाही. मुंबईतल्या दादर या ठिकाणी भाजपाची बैठक पार पडली. यावेळी आमदारांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पळणारा नाही, लढणारा आहे असं म्हणत रणशिंग फुंकलं आहे.

पराभव होतो पण एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडायचं नाही

कधीकधी पराभव होतो, पण पराभव झाल्यानंतर एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडायचं नाही. आपलीही काही मतं आहेत. आपल्याकडेही काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढळला. जे अभाव आढळले आहे त्या पक्षाच्या नेत्यांना मी सांगणार आहे की कुठे समन्वयाचा अभाव दिसला. आपली मदत मित्रपक्षांना झाली आहे, मित्रपक्षांची मदत आपल्याला झाली आहे. शिवसेना आपला जिवाभवाचा मित्र आहे. त्यांच्या सात जागा निवडून आल्या आहेत. आपल्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केलं आहे. मला वाटतं की काही नरेटिव्ह तयार केले जात आहेत, ते कुणीही करु नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मी हे सांगितलं आहे. बऱ्याचवेळा प्रवक्ते बोलतात ते समजून बोललं पाहिजे. आत्ताची वेळ उणीधुणी काढण्याची नाही. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निवडून आले आहेत. एकमेकांना बरोबर घेऊन चालणं महत्त्वाचं आहे.

हे पण वाचा- “मी पळणारा नाही, लढणारा आहे..”, लोकसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

आता कसलीही विश्लेषणं करत बसू नका

भाजपातर्फे, शिवसेनेतर्फे, राष्ट्रवादीतर्फे वेगळी विश्लेषणं करु नका. सगळ्यांनी एकाच सूरात बोललं पाहिजे. बातम्या पेरण्याचं काम, बातम्या समोर आणण्याचं काम हे सगळं महायुतीसाठी योग्य नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासमोर मांडलेलं स्टॅटिस्टिक्स लक्षात ठेवा. आपला लीड लक्षात घ्या. विधानसभेत चित्र बदलणं आपल्याला कठीण नाही. खोट्या नरेटिव्हचं आयुष्य जास्त नसतं हे लक्षात घ्या. ५१ टक्क्यांसाठी साडेतीन टक्के वाढवायची आहेत. आपली ताकद तेवढी आहेच. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एकीकडे मोदी देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा होत आहेत याचा आनंद आपण साजरा केलाच पाहिजे. आपण सगळे आता आपल्या मित्रांना घेऊन मैदानात उतरु. पुन्हा एकदा, मैदान फत्ते करु असा मला विश्वास आहे. आपण सगळ्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी आभार मानतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.