विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्त गावांना त्यांनी यावेळी भेट दिली. शाळेत तात्पुरता आसरा घेतलेल्या दरडग्रस्त लोकांच्या त्यांनी यावेळी व्यथा जाणून घेतल्या. “निसर्गानं सारं काही हिरावून घेतलं साहेब,लयं मोठं दुःख हाय काय करायचं.”, असे सांगून आंबेघरच्या पीडितांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. यावेळी फडणवीस यांनी घाबरू नका. मला कल्पना आहे, दुःख खूपचं मोठं आहे. थोडा धीर धरा. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. काळजी करू नका, असा ठाम विश्वासही त्यांनी पूरग्रस्तांना दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेत्यांच्या पूरग्रस्त दौऱ्याबाबत केलेल्या सूचनेचं त्यांनी समर्थन केलं. “त्यांनी केलेली सूचना योग्यच आहे. कारण बचाव कार्यात अडथळा येऊ नये यासाठी त्यांनी केलेली सूचना महत्त्वाची आहे”, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

आंबेघर दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. आंबेघर येथील पीडितांचं तात्पुरते स्थलांतर मोरगिरीतील मोरणा विद्यायात करण्यात आले आहे. यावेळी फडणवीसांनी पूरग्रस्तांची विचारपूस केली, तसेच पूरग्रस्तांसोबत शाळेमध्ये जेवणही केले. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अण्णाभाऊ पाटील माथाडी संघाचे नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. “शासनाने लवकरात लवकर पुनर्वसनाचे सोपस्कार पूर्ण करून करावेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. येथील लोकांना किती मदत मिळाली आहे?, त्यांची काय सोय केली आहे?, याची माहिती घेतलेली नाही. परंतु शासकीय स्तरावरून जी ठरलेले असते ती नियमित मदत मिळेल.”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषानुसार तातडीची मदत दिली जाणार – एकनाथ शिंदे

रायगडमधील तळीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली असताना साताऱ्यातील पाटण तालुक्यात असाच प्रकार घडला होता. आंबेघर या गावात दरड कोसळून जवळपास १५ लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. २३ जुलैला दुपारी हा प्रकार समोर आला. आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले होते.