करोना योद्धांना १० जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे. तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. ३ जानेवारीपासून या मुलांचं लसीकरण सुरू होणार आहे. तर ६० वर्षांवरील नागरीकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस दिला जाईल, अशा तीन महत्वाच्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. ओमियोक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणांचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय.
ओमायक्रॉनची भीती लोकांच्या मनात घर करू लागली आहे. सुशासन दिनानिमित्त पंतप्रधानांनी केलेल्या घोषणांमुळे १५ ते १८ वयोगटातील मुलं लसीकरणामुळे सुरक्षित राहतील. तर, ६० वर्षांवरील लोक ज्यांना गंभीर आजार आहेत, ते बूस्टर डोसमुळे सुरक्षित राहतील, असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यपालांचे अधिकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात राज्यपालांच्या अधिकारांमध्ये जे बदल करण्यात आले आहेत, ते संविधानातील तरतुदींशी सुसंगत वाटत नाही. अशाप्रकारे राज्यपालांचे अधिकार कमी करणं, त्याऐवजी मंत्रिमंडळाचा सहभाग वाढवणं हे योग्य नाही, त्यामुळे भाजपा त्याचा विरोध करत आहे, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, अधिवेशनात काही आमदार करोना पॉझिटीव्ह आढळल्याची चर्चा आहे. त्यावरून सरकार अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे का, असं विचारलं असता पाच दिवसांचं अधिवेशन आहे, त्यातले तीन दिवस गेलेत आणि दोन दिवस उरलेत, त्यामुळे अधिवेशन गुंडाळून किती गुंडाळणार, असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला.