महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेकडून हे मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. असं असतानाच आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्विट्सच्या माध्यमातून पवारांवर निशाणा साधलाय. बाबासाहेबांच्या विचारांची आठवण फडणवीसांनी शरद पवारांना ट्विटसच्या माध्यमातून करुन देत पवारांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांचा दाखला दिलाय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘हिंदू टेरर’चा पहिल्यांदा वापरणारे ते मुस्लिमांना…; फडणवीसांचे सर्वच्या सर्व १४ ट्विट्स जसेच्या तसे

एका ट्विट थ्रेडच्या माध्यमातून फडणवीसांनी शरद पवार यांनी वेगवगेळ्या विषयांवर केलेलं भाष्य आणि त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत या सर्वांची बाबासाहेबांच्या विचाराशी सांगड घातलीय. एका ट्विटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम ३७० ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून अलिकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानांचाही समाचार फडणवीसांनी घेतला आहे. तसेच नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाचेही फडणवीसांनी स्मरण करुन देत पवारांवर निशाणा साधला. तसेच अन्य एका ट्विटमध्ये इशरत जहाँ ही निर्दोष होती असं पवारांनी वक्तव्य केल्याच्या बातमीची लिंक पोस्ट कर पवारांवर टीका केलीय. इतक्यावरच न थांबता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख फडणवीसांनी केलाय.

फडणवीस यांनी २०१२ मध्ये राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना मुंबईतील आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली गेली यावरुनही बातमीची लिंक पोस्ट करत टीका केलीय. तसेच आघाडी सरकारने त्यावेळी रझा अकादमीवर कारवाई केली नाही, याचाही उल्लेख फडणवीसांनी केलाय.

तसेच पुढे बोलताना फडणवीसांनी संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला, याबद्दलच्याही लिंक पोस्ट केल्यात. अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो या शरद पवारांच्या वक्तव्याची आठवणही फडणवीसांनी करुन दिली. तसेच ‘हिंदू टेरर’ हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, असे विचारत फडणवीसांनी निशाणा साधलाय. सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी केलेल्या मागणीचाही उल्लेख फडणवीसांनी या १४ ट्विटपैकी एकामध्ये केलाय.

तसेच १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यासंदर्भातही फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “कश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून?,” असा प्रश्न फडणवीसांनी शरद पवारांना विचारलाय. तसेच, “काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का?,” असंही फडणवीस म्हणालेत.

या ट्विट थ्रेडच्या शेवटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Story img Loader